• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

माणिकताई करंदीकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्यात ‘माहेर’ भेटीचा आनंद

ByMirror

Apr 27, 2026
ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच -डॉ. निरज करंदीकर

1965 पासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थिनी आल्या एकत्र; आठवणींनी भारले शाळेचे वातावरण


ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच -डॉ. निरज करंदीकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रम संस्था संचलित माणिकताई करंदीकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बालिकाश्रम रोड येथील मुलींच्या शाळेच्या 1965 पासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मैत्रिणी, शिक्षक आणि शाळेच्या आठवणींनी संपूर्ण परिसर अक्षरशः भारावून गेला.


या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे पाचशेहून अधिक माजी विद्यार्थिनी उपस्थित राहिल्या. पुणे, ठाणे, कल्याण, मुंबई, औरंगाबाद, नाशिक तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा शाळेच्या आवारात आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. कोणी आजी, कोणी आई, काकू, मावशी झालेल्या या सर्वांनी एकमेकींना भेटताच जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या. शाळेतील वर्ग, मैदान आणि परिसर मैत्रीच्या हास्याने गजबजून गेला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. निरज करंदीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सौ. दीप्ती करंदीकर, माजी विद्यार्थिनी व विद्यमान नगरसेविका आशा डागवाले, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, बुरुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्री कुंटला, बालिकाश्रम बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका राधिका लगड, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका हेमा चाफेकर यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यालयाचे आजी-माजी शिक्षकवृंदही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य अनिल सुद्रिक यांनी प्रास्ताविकात संस्थेचा गौरवशाली इतिहास उलगडला. इ.स. 1943 मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या वंचित आणि उपेक्षित मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याच्या उदात्त हेतूने कै. जानकीबाई आपटे यांनी या संस्थेची स्थापना केली. त्या काळात मुलींच्या शिक्षणाकडे समाज गांभीर्याने पाहत नसतानाही त्यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला, ही गोष्ट आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


त्यानंतर कै. माणिकताई करंदीकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले. तसेच कै. डॉ. जयंत करंदीकर यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे संस्थेच्या प्रगतीला अधिक बळ मिळाले. या तिन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या त्याग, दूरदृष्टी आणि कार्यामुळेच संस्थेचा भक्कम पाया उभा राहिला असून, आजचा विकास हा त्यांच्या कार्याचा जिवंत वारसा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


माणिकताई करंदीकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने हजारो विद्यार्थिनी घडवून त्यांना विविध क्षेत्रांत यशस्वी बनविले आहे. शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात अनेक माजी विद्यार्थिनी उल्लेखनीय कार्य करत असून, हीच संस्थेच्या कार्याची खरी पावती असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


प्राचार्य सुद्रिक यांनी सर्व माजी विद्यार्थिनींना सामाजिक बांधिलकी जपत संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणारे दाते, सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवक आणि सर्व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी माजी विद्यार्थिनींच्या मनोगताचा कार्यक्रम विशेष भावनिक ठरला. अनेकांनी शाळेने दिलेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन, मैत्रीच्या आठवणी आणि आयुष्यात घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही जणी जुन्या आठवणी सांगताना भावूक झाल्या. शिक्षकांनीही विद्यार्थिनींच्या यशाचा अभिमान व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.


अध्यक्षीय समारोपात डॉ. निरज करंदीकर यांनी भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त करत सांगितले की, “संस्थेचा तीन पिढ्यांचा सामाजिक कार्याचा वारसा अनुवंशिकतेतून माझ्यापर्यंत आला आहे. ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच असून, हा स्नेहमेळावा म्हणजे ‘माहेर मेळावा’ आहे.” त्यांनी पुढे आश्‍वासन दिले की, संस्थेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून तिची उत्तरोत्तर प्रगती साधली जाईल. माजी विद्यार्थिनींचा जिव्हाळा आणि सहभाग हीच संस्थेची खरी ताकद असून, समाजातील सर्व घटकांनी सामाजिक कार्यासाठी हातभार लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या शिक्षक-शिक्षिकांची भेट घेत संवाद साधला. लग्नानंतर सासरी गेलेल्या अनेक जणींना जणू माहेरी आल्याचा आनंद लाभला होता. स्नेह, आपुलकी, आठवणी, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणारा हा मेळावा सर्वांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सर्व माजी विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किशोर अहिरे यांनी मानले. आश्रम प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *