• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

लग्नात वाटले ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक

ByMirror

Apr 27, 2026
“जात नव्हे, कर्तृत्व हीच ओळख” — सत्यशोधक विचारांचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याचा पीपल्स हेल्पलाईनचा उपक्रम


“जात नव्हे, कर्तृत्व हीच ओळख” — सत्यशोधक विचारांचा संदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी) — “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याबद्दल पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरातील महेश भोसले आणि दुर्गा चांदणे यांच्या विवाह सोहळ्यात उपस्थित वऱ्हाडी मंडळींना “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक वाटप करण्यात आले.


विवाह सोहळ्यात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सामाजिक संदेश देण्यात आला. सत्ताधारी आणि अंधभक्तांनी निर्माण केलेल्या तथाकथित “भोंदूशाही”ला रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. कार्यक्रमात भावनिक राजकारणाला चालना दिल्याचा आरोप करत, देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजच्या भारतासाठी जिवंत प्रेरणामिशन आहेत. आजच्या समाजात अजूनही जातव्यवस्था आणि स्त्रीदास्याचे अस्तित्व दिसून येते. मात्र, स्वराज्य स्थापनेच्या काळात शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांनी अन्यायकारक परंपरांना फाटा देत समानता, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानावर आधारित स्वराज्य उभारले.


त्यांचे राज्य धर्माधारित नव्हते, तर कर्तृत्वाधारित होते. “जात नव्हे, कर्तृत्व हीच ओळख” हा संदेश त्यांनी आपल्या पराक्रमातून दिला. शिवाजी महाराजांचा वारसा हा केवळ इतिहास नसून सामाजिक परिवर्तनाचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश थोरात म्हणाले की, हिंदू धर्माच्या नावाचा वापर केवळ भावनिक राजकारणासाठी केला जात आहे. समाजात काही तथाकथित “भोंदूबाबा” महिलांच्या सन्मानावर आघात करून सामान्य लोकांची पिळवणूक करत आहेत. राजकारण आणि समाजकारणात अशा प्रवृत्ती वाढल्यामुळे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी अयोग्य स्पर्धा निर्माण झाली आहे.


काही भोंदूमहाराज आणि राजकारणी चुकीचा इतिहास सांगून समाजाला दिशाभूल करत आहेत. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी खरा इतिहास आणि सत्यशोधक विचार स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ससाणे महाराज, महेश भोसले, अशोक भोसले, पोपट भोसले, निर्मला शिंदे, विनायक शेंडगे, काशिनाथ भोसले, बापू शेलार, कल्पना तसेच मानवी अभियानचे जिल्हा संघटक चंद्रकांत घोडके, लखन साळवे यांसह वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *