• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिव्यांग मुलाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

ByMirror

Apr 17, 2026
वेदनांतून उभी राहिलेली माणुसकी; गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

वेदनांतून उभी राहिलेली माणुसकी; गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात


“इतर मुलांमध्येच माझा नचिकेत” – बाबासाहेब बोडखे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयात एक वेगळाच, हृदयाला स्पर्श करणारा प्रसंग अनुभवायला मिळाला. शिक्षक वडिलांनी आपल्या दिव्यांग मुलाच्या वाढदिवसाला केवळ घरापुरता आनंद न ठेवता, तो समाजासोबत वाटण्याचा निर्णय घेतला आणि त्या भावनेतून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.


शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी आपल्या दिव्यांग मुलगा नचिकेत बोडखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. नचिकेतला इतर मुलांप्रमाणे शाळेत जाता येत नाही, ही जाणीव मनाला टोचत असतानाही बोडखे यांनी त्या वेदनेला सकारात्मक रूप देऊन गरजू विद्यार्थ्याांमध्ये आपल्या मुलाचे शिक्षण पाहिले. दरवर्षी ते आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबवत असतात.


कार्यक्रमात नचिकेतच्या हस्तेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत भावना दाटून आल्या, कारण त्या वाटपामागे केवळ वस्तू नव्हत्या, तर एका वडिलांचे प्रेम, वेदना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी होती. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुहास धिवर, बाबासाहेब बोडखे, गोपीचंद परदेशी, कमल भोसले, कविता जोशी, वैभव शिंदे, सुदेश छजलाने, शिल्पा घायतडक, मोनिका मेहतानी, परीक्षित सुने, नूतन गाडे, पिंकी कुलटकर, मोनिका साळुंके, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याच वेळी आणखी एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. दोन वर्षांपूर्वी नचिकेतच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडांचे संगोपन करून त्यांचा “दुसरा वाढदिवस” साजरा करण्यात आला. झाडांना फुलांच्या माळा घालून आरती करण्यात आली. जणू काही त्या झाडांमध्येही नचिकेतच्या आयुष्याचा आनंद साजरा होत होता.


मुख्याध्यापक सुहास धिवर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “बोडखे सरांनी आपल्या वैयक्तिक वेदनेला समाजोपयोगी कार्यात बदलले आहे. ही केवळ मदत नाही, तर समाजाला दिशा देणारा संदेश आहे. अशा शिक्षकांमुळेच समाजात माणुसकी जिवंत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


बाबासाहेब बोडखे म्हणाले की, “माझा मुलगा नचिकेत त्याला इतर मुलांसारखे शाळेत जाता येत नाही, हे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठे दुःख आहे. प्रत्येकवेळी शाळेत जाताना, मुलांना पाहताना मला त्याची आठवण येते मन भरून येते. पण मी ठरवलंही वेदना मला खचवणार नाही, तर समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची ताकद देणार. म्हणूनच मी नचिकेतचा वाढदिवस साजरा करताना इतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासाठी ही सर्व मुलं म्हणजेच माझा नचिकेत आहेत. त्यांच्या डोळ्यातील चमक, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूहेच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने वाढदिवसाचं गिफ्ट आहे. आपण आपल्या मुलांसाठी जगतो, पण समाजासाठीही काहीतरी देणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येकाने जर आपल्या आनंदाचा एक छोटासा भाग इतरांसोबत वाटला, तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पडू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *