बाबासाहेबांनी दिलेला समता, शिक्षण आणि संविधानाचा मार्गच खरा -विजय भालसिंग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शहरातील मार्केटयार्ड परिसरात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांच्या विचारांना आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग व नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाला पंकज लोखंडे, प्राजक्ता लोखंडे, जयश्री गायकवाड, विठ्ठल उमाप, ज्योती साठे, राजू डोईफोडे, राजेंद्र लोखंडे, अमित लोखंडे, प्राजक्ता लोखंडे, नितीन साठे, पूजा लोखंडे, राजू उमाप, जावेद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिक्षण, समता आणि बंधुता यांचे मूल्य आजही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी भारतीय समाजाला संविधानाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेचा मार्ग दाखवला. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त जयंती साजरी करून थांबून चालणार नाही, तर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. शिक्षण हीच खरी शक्ती असून, प्रत्येक युवकाने ज्ञानाच्या बळावर स्वतःसह समाजाचा विकास साधण्याचे त्यांनी आवाहन केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, संविधान हा देशाचा कणा आहे. त्याच्या माध्यमातून सर्व घटकांना समान न्याय मिळतो. समाजात एकोपा आणि बंधुभाव टिकवण्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रसार होणे आवश्यक आहे. “धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि सामाजिक समता यांचे धडे बाबासाहेबांनी दिले. आजच्या काळात त्यांची अधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
