• Sun. Aug 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

लेझिमच्या ठेक्यावर भीम जयंतीचा जल्लोष; चिमुकल्यांचे दमदार सादरीकरण

ByMirror

Apr 15, 2026
बोल्हेगावात 17 ते 19 एप्रिल दरम्यान तीन दिवस रंगणार भीम जयंती सोहळा

ज्ञानदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे अनोखे अभिवादन; भीम गीतांनी भारावला परिसर


बोल्हेगावात 17 ते 19 एप्रिल दरम्यान तीन दिवस रंगणार भीम जयंती सोहळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ज्ञानदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक लेझिम पथकाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले. या मिरवणुकीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत भीम गीत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतांवर लेझिमचे आकर्षक डाव सादर केले.


विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. त्यांच्या कलागुणांना उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत प्रोत्साहन दिले. यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पंकज लोखंडे, संचालिका प्राजक्ता लोखंडे, जयश्री गायकवाड, विठ्ठल उमाप, ज्योती साठे, राजू डोईफोडे, राजेंद्र लोखंडे, अमित लोखंडे, नितीन साठे, पूजा लोखंडे, राजू उमाप, जावेद सय्यद, दिलशाद अन्सारी, रमेश लोखंडे, अनिल डोईफोडे, क्लेरा लोखंडे, जॉन्सन लोखंडे, प्रशांत लोखंडे, सिद्धी ओहोळ, रेखा गायकवाड, प्रगती गायकवाड, प्रियंका जाधव, अक्षय लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे देशाच्या प्रगतीचे अधिष्ठान आहे. आजची तरुण पिढी आणि विद्यार्थी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आहेत. ज्ञानदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी लेझिमच्या माध्यमातून दिलेले सादरीकरण हे केवळ कला नसून, बाबासाहेबांप्रती असलेला आदर आणि अभिमान व्यक्त करणारे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संस्कार वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी सांगितले.


पंकज लोखंडे म्हणाले की, भीम जयंती हा केवळ उत्सव नसून तो सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा दिवस आहे. ज्ञानदीप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. येत्या 17 ते 19 एप्रिल दरम्यान बोल्हेगाव येथे आयोजित ‘संविधान जागर अभियान’ हे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे ठरेल. सांस्कृतिक कार्यक्रम, भीम गीत व स्पर्धांद्वारे बाबासाहेबांचे विचार जनमानसात रुजविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


ज्ञानदीप फाउंडेशन व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप, नगरसेवक सुरेश बनसोडे व कुमारसिंह वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली 17, 18 व 19 एप्रिल रोजी बोल्हेगाव येथे ‘भीम जयंती सप्ताह’ अंतर्गत संविधान जागर अभियान राबविण्यात येणार आहे. या तीन दिवसीय उपक्रमात पारंपारिक वाद्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भीम गीतांचा भव्य कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *