• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रकाच्या मुलाची टॅक्स असिस्टंट पदावर निवड

ByMirror

Apr 11, 2026
पदाचा उपयोग समाजासाठी करावा -खासदार निलेश लंके

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने गौरव


पदाचा उपयोग समाजासाठी करावा -खासदार निलेश लंके

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक दत्तू शेळके यांचा मुलगा प्रविण शेळके याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत टॅक्स असिस्टंट पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते प्रविण शेळके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बलभीम कुबडे, प्रतिनिधी मच्छिंद्र शिंदे, मोहन औटी, आप्पासाहेब सुंबे तसेच दत्तू शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


खासदार निलेश लंके म्हणाले की, प्रविण शेळके यांचे यश हे केवळ वैयक्तिक नाही, तर समाजासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. अत्यंत सामान्य घरातून येऊन त्यांनी ज्या प्रकारे मेहनत आणि जिद्दीने हे स्थान मिळवले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या उदाहरणातून प्रेरणा घ्यावी. सरकारी पद हे केवळ नोकरी नसून समाजसेवेचे माध्यम आहे. प्रविण यांनी आपल्या पदाचा उपयोग गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बलभीम कुबडे म्हणाले की, दत्तू शेळके यांनी एसटी महामंडळात काम करताना प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांच्या या गुणांचे प्रतिबिंब त्यांच्या मुलाच्या यशातून स्पष्ट दिसते. प्रविणने कठोर परिश्रम, संयम आणि आत्मविश्‍वास यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आजच्या तरुणांनी मोबाईल व इतर गोष्टींपेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले भविष्य घडविण्याचे आवाहन केले.


प्रविण शेळके याचे वडिल दत्तू शेळके पारनेर आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले असून, प्रविण याने अत्यंत साध्या व सर्वसामान्य परिस्थितीतून कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. उपस्थित मान्यवरांनीही प्रविण शेळके यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशामुळे संपूर्ण कर्मचारी वर्गाचा सन्मान वाढल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *