• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे हरिनाम सप्ताहाची भावपूर्ण सांगता; काल्याच्या कीर्तनाने वातावरण भारावले

ByMirror

Mar 28, 2026
दहीहंडी, कीर्तन आणि महाप्रसादाने सोहळा संपन्न

श्रीराम नवमीनिमित्त 39 वर्षांची परंपरा कायम; पंचक्रोशीतील भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती


दहीहंडी, कीर्तन आणि महाप्रसादाने सोहळा संपन्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची यंदाही भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या सप्ताहाचे हे सलग 39 वे वर्ष असून, गावासह पंचक्रोशीतील भाविक या धार्मिक सोहळ्याने भक्तीरसात न्हाऊन निघाले.


संपूर्ण सप्ताहभर हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि ज्ञानेश्‍वरी पारायणाने गावातील वातावरण भक्तीमय बनले होते. या सोहळ्याची सांगता ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यांच्या प्रभावी वाणीने आणि रसाळ कथनशैलीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.


कीर्तनात घुगे महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे अत्यंत समर्पक वर्णन केले. ते म्हणाले, “भगवान श्रीकृष्णाचे चरित्र हे केवळ कथा नसून जीवन जगण्याची दिशा देणारे आहे. त्यांनी संकटांवर मात करत धर्म, सत्य आणि कर्तव्य यांचा मार्ग दाखविला. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात श्रीकृष्णाच्या तत्वांचा स्वीकार केल्यास समाजात सद्भावना आणि शांतता निर्माण होईल.”


ते पुढे म्हणाले, “आजच्या धावपळीच्या जीवनात भक्ती, नामस्मरण आणि संतसाहित्य यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. हरिनाम सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नवीन पिढीला संस्कारांचा वारसा मिळतो.”
कीर्तनानंतर घुगे महाराजांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवत आणि जयघोष करत उत्साह व्यक्त केला. वातावरणात “गोविंदा गोपाळा” चा निनाद घुमला. या कार्यक्रमाला माधवराव लामखडे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, भागचंद जाधव, काशीनाथ पळसकर, प्रशांत जाधव, भरत बोडखे, प्रमोद जाधव, बापू फलके, भानुदास ठोकळ, नवनाथ जाधव, बापू सुंबे, उत्तम कांडेकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर, डॉ. विजय जाधव, अतुल फलके, संदीप येणारे, पिंटू जाधव, चंद्रकांत पवार आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नाथयोगी परिवारातील युवकांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *