• Sun. Mar 15th, 2026

महाराष्ट्र स्टेट लीगमध्ये फिरोदिया शिवाजियन्सला चौथे स्थान

ByMirror

Mar 15, 2026

बलाढ्य संघांविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी; मुंबई एफसीवर मोठा विजय


26 मार्चपासून पुढील टप्प्यासाठी तयारी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल संघाने WIFA महाराष्ट्र स्टेट लीग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे. पाच सामने पूर्ण झाल्यानंतर संघाने गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले असून, महाराष्ट्रातील बलाढ्य संघांविरुद्ध खेळताना जिद्द, संघभावना आणि आक्रमक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.


स्पर्धेतील सर्वात मोठा विजय फिरोदिया शिवाजियन्सने मुंबई एफसीसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मिळवला. या सामन्यात संघाने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली आणि स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली.


जीओजी फिन क्यू संघाविरुद्धच्या सामन्यातही फिरोदिया शिवाजियन्सने लढाऊ वृत्ती दाखवली. सामन्याच्या पहिल्याच दहा मिनिटांत दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या संघाने शानदार पुनरागमन करत 22 अशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे हा संघ पुणे लीगचा विजेता असून, त्यामध्ये संतोष ट्रॉफीचे अनुभवी खेळाडू आहेत.


ठाणे जिल्ह्यातील कल्याण ईस्ट एफसी विरुद्धच्या सामन्यातही फिरोदिया शिवाजियन्सने जिद्दीचा खेळ करत 01 पिछाडीवरून 11 अशी बरोबरी साधली. तर मॅजिक मेड एफसी विरुद्धच्या सामन्यात संघाने उत्कृष्ट बचाव आणि नियोजनबद्ध खेळ करत 10 असा महत्त्वपूर्ण विजय मिळवला. पहिल्या टप्प्यातील शेवटच्या सामन्यात नाशिक सिटी एफसी विरुद्ध संघाला 25 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र संपूर्ण स्पर्धेत संघातील खेळाडूंनी जिद्दीने लढत देत चांगली कामगिरी केली. या मोहिमेदरम्यान संघातील अनेक खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला. तरीही संघाचे फिजिओ डॉ. आश्री बगदादी यांनी खेळाडूंना लवकरात लवकर तंदुरुस्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.


संघ परतल्यानंतर सहमालक नरेंद्र फिरोदिया आणि मनोज वालवेकर यांनी खेळाडूंचे स्वागत करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. मुख्य प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी आणि व्यवस्थापक अभिषेक सोनवणे यांनीही खेळाडूंच्या जिद्दीचे, संघभावनेचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. आता संघ तीन दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा सरावाला सुरुवात करणार असून 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या पुढील टप्प्यासाठी जोरदार तयारी करणार आहे. संघ व्यवस्थापनाला विश्‍वास आहे की, फिरोदिया शिवाजियन्स पुढील सुपर लीग टप्प्यासाठी पात्र ठरत आणखी दमदार कामगिरी करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *