आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशनचा उपक्रम; स्वावलंबी महिलांचा सन्मान
शिक्षणामुळेच स्त्री सशक्त होते -अरुणाताई पारधे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील महिलांना प्रोत्साहन देणे, स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे तसेच सामाजिक बांधिलकी दृढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य विभागातील अरुणाताई पारधे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वसंतराव पारधी, पोलीस उपनिरीक्षक मन्सूर सय्यद, बांधकाम विभागातील अभियंता पुनम प्रकाश थोरात तसेच महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग कार्यालयातील अवैद्यकीय सहाय्यक सुनील पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करून महिला सशक्तीकरणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात अरुणाताई पारधे यांनी महिलांच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, स्त्री शिक्षण हा केवळ अधिकार नसून समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली.
स्त्री शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, समानतेची जाणीव निर्माण होते आणि समाजात सन्मानाने जगण्याची ताकद मिळते. त्यामुळे प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतीराव फुले यांच्या कार्याचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, ज्योतीराव फुले यांनी अहमदनगर येथे मिशनरी शिक्षिका मिस फरार यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिली होती. त्या शाळेतील शिक्षणपद्धती पाहून ते प्रभावित झाले आणि त्यातूनच पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्याच माध्यमातून मुलींच्या शिक्षणाची चळवळ सुरू झाली. या ऐतिहासिक कार्यामुळे भारतीय समाजात स्त्री शिक्षणाला नवी दिशा मिळाली, असे त्यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक मन्सूर सय्यद यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्त्व विशद केले. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि कायद्याचे ज्ञान यांचा आधार घेत स्वतःला सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले. समाजात महिलांनी भीती न बाळगता आपल्या हक्कांसाठी उभे राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशनच्या संस्थापक सदस्य कुंदबाला मोहन गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. मनीषा लक्ष्मण यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत आरोग्य, स्वावलंबन आणि जागरूकतेविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
यावेळी संस्थेमार्फत स्वावलंबी बनविण्यात आलेल्या मुलींचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच झोपडपट्टी परिसरात कार्यरत स्नेहालय संचालित बालभवन येथील समाजसेविका महिलांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशनने गेल्या पाच वर्षांत मुलींसाठी राबविलेल्या कौशल्य विकास, मार्गदर्शन आणि सामाजिक पाठबळ या उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश थोरात व डेव्हिड अवचित यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते निर्मला केदारी, मनीषा शिंदे, उज्वला गायकवाड, शिवाजी जाधव, वैशाली पार्ले, प्रशांत भोंग, सुनील बोर्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशनच्या प्रमुख निर्मला केदारी यांनी मानले.
