• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

खाकीतील कर्तृत्वान महिलांचा गौरव

ByMirror

Mar 11, 2026
महिला सुरक्षिततेसाठी व समाजरक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला पोलीसांना सलाम

महिला दिनानिमित्त कोतवालीत झाला सन्मान


महिला सुरक्षिततेसाठी व समाजरक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला पोलीसांना सलाम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या महिला पोलीसांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग आणि ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, पीएसआय आमीन शेख यांच्यासह कार्यरत सर्व महिला पोलीसांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक क्षेत्रातील रजनी ताठे, नलिनी गायकवाड, शारदा होशिंग, गौतमी भिंगारदिवे, निता कटारिया, सौ. बर्वे आदी महिला उपस्थित होत्या.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला पोलीसांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या धैर्य, कर्तव्यदक्षता आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र काम करताना महिला पोलीस अनेक आव्हानांना सामोरे जात असतात, मात्र कर्तव्यनिष्ठेने त्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


विजय भालसिंग म्हणाले की, समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती समाजासाठी विश्‍वासार्ह ठरते. अनेक वेळा कठीण परिस्थितीतही त्या धैर्याने काम करतात. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळते आणि समाजातही महिला सशक्तीकरणाचा संदेश पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहेत. पोलीस दलासारख्या कठोर आणि जबाबदारीच्या क्षेत्रात महिला अधिकारी व कर्मचारी अत्यंत धैर्याने काम करत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. अशा महिला पोलीसांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


या प्रसंगी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजाच्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *