• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

महिला दिनानिमित्त मोफत स्तन व गर्भपिशवी कर्करोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Mar 8, 2026
कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंध आणि एचपीव्ही लसीबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

पद्मशाली स्नेहिमा संघम व निमा वुमन्स फोरमचा उपक्रम; शंभरहून अधिक महिलांची तपासणी


कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंध आणि एचपीव्ही लसीबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पद्मशाली स्नेहिमा संघम आणि निमा वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्यासाठी स्तनाचा व गर्भपिशवीचा कर्करोग याबाबत मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात महिलांची तपासणी करून स्तनाचा तसेच गर्भपिशवीचा कर्करोग टाळण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन करण्यात आले.


अलिकडच्या काळात महिलांमध्ये स्तनाचा व गर्भपिशवीचा कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या गंभीर आजाराबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि वेळेवर तपासणी करून रोगाचे लवकर निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरात पद्मशाली स्नेहिमा संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्नाताई बल्लाळ, डॉ. अंशू मुळे आणि डॉ. मानसी कांबळे यांनी कर्करोगाची कारणे, लक्षणे, त्यावरील उपचार तसेच वेळेवर निदानाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले.


यावेळी डॉ. कांचन रच्चा यांनी गर्भपिशवीचा कर्करोग टाळण्यासाठी दिली जाणारी एचपीव्ही व्हॅक्सिन (HPV) लस, तिचे डोस आणि वयानुसार ती कशी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली. कर्करोग पहिल्या टप्प्यात ओळखला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे सांगत त्यांनी स्त्रियांनी स्वतः स्तनाची तपासणी कशी करावी याचे प्रात्यक्षिकही दाखवून दिले. तसेच शिबिरात उपस्थित सर्व महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात आली.


या शिबिरात डॉ. अंशू मुळे, डॉ. मानसी कांबळे, डॉ. कांचन रच्चा, डॉ. रत्ना बल्लाळ, डॉ. प्रेरणा छिंदम, डॉ. प्रांजल आडेप आणि डॉ. प्रीती सुरकुटला यांनी महिलांची तपासणी केली. जवळपास शंभरहून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी पद्मशाली स्नेहिमा संघमच्या उपाध्यक्षा रेखा वडेपल्ली, सचिव सपना छिंदम यांच्यासह पुनम वन्नम, साधना कोळपेक, नीता बुरा, विजया गुंडू, प्रमिला वन्नम, सविता एक्कलदेवी, आरती छिंदम, सरोजा गुडा, रोहिणी पागा, कांचन कुंटला, कल्पना बुलबुले, सविता कोठारी, रेखा गरुड, ऐश्‍वर्या अंकाराम, सविता येनगुंदुल, निर्मला गुंडू, सरू रच्चा, लक्ष्मी गुंडू, प्रमिला चिल्का आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *