इंडियन डेंटल असोसिएशन, अहिल्यानगर शाखेचा उपक्रम; दातांच्या आरोग्याविषयी जागृती
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व -आनंद कटारिया
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) स्कूलमध्ये इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य, दंत स्वच्छता आणि योग्य सवयींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हा उपक्रम कम्युनिटी डेंटल हेल्थ अंतर्गत राबविण्यात आला. डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ओंकार भालसिंग आणि सचिव डॉ. शिल्पा इनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात सहभागी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी करून दातांवरील कीड, हिरड्यांच्या समस्या आणि स्वच्छतेची स्थिती यांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने ब्रश कसा करावा, फ्लॉसिंगचे महत्त्व, तसेच संतुलित आहाराचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे ‘ट्रॅफिक सिग्नल’च्या उदाहरणाद्वारे दातांची कीड आणि स्वमूल्यांकन ही संकल्पना अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आली. हिरवा रंग निरोगी दात, पिवळा रंग काळजी घ्या आणि लाल रंग तातडीने उपचार घ्या, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वतःच्या दातांचे निरीक्षण करण्याचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी दातांची कीड टाळण्यासाठी आणि नियमित तपासणीसाठी मार्गदर्शक सूचना असलेले भिंतपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्या निकिता कटारिया यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात प्राचार्य आनंद कटारिया म्हणाले की, जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारांचे धडे दिले जातात. आदर्श व्यक्तिमत्त्व असलेली पिढी घडविण्याचा आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व दिले जाते. त्यांच्या आहार, व्यायाम आणि स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्टीने हे दंत तपासणी शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. ओंकार भालसिंग म्हणाले की, लहान वयातच दातांची योग्य काळजी घेतली तर भविष्यातील गंभीर समस्या टाळता येतात. अनेक वेळा लहान मुलांमध्ये साखरयुक्त पदार्थांचे अतिसेवन आणि योग्य ब्रशिंग न केल्यामुळे दातांची कीड वाढते. त्यामुळे शालेय स्तरावर अशा शिबिरांच्या माध्यमातून जागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. शिल्पा इनमुलवार यांनी सांगितले की, कम्युनिटी डेंटल हेल्थ उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे. दातांचे आरोग्य चांगले असेल तर एकूण आरोग्यही चांगले राहत असल्याचे सांगितले.
या शिबिरात डॉ. प्रिया भालसिंग, डॉ. प्राजक्ता झावरे, डॉ. स्वाती कुलंगे आणि डॉ. प्रांजल गायकर यांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांची तपासणी व मार्गदर्शन केले. या शिबिरात विद्यार्थ्यांना दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करा, साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा, गुटखा, तंबाखू यांसारख्या घातक पदार्थांपासून दूर राहा, आरशात नियमितपणे दात तपासा; डाग किंवा खड्डे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, दर सहा महिन्यांनी दंत तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
