• Fri. Feb 27th, 2026

ज्योत्स्ना उद्योग केंद्राच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून मशीनद्वारे तपासणी

ByMirror

Feb 27, 2026

शहरात दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

पालकांसाठी आरोग्य, लैंगिक शिक्षण व वयात येण्याच्या प्रश्‍नांवर मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील टिळक रोड येथील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचालित मतिमंद मुलांची शाळा व ज्योत्स्ना उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ज्योत्स्ना उद्योग केंद्राच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची आधुनिक मशीनद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली.


या शिबिरात रेटिना तज्ज्ञ डॉ. क्षितिज तांबोळी यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. तपासणीनंतर आवश्‍यकतेनुसार विद्यार्थ्यांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.


कार्यक्रमास ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेचे प्रमुख भाऊसाहेब कदम, मतिमंद मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा म्हातारदेव-बनकर, मानसशास्त्रज्ञ माधवी कुठे, वाचा उपचार तज्ज्ञ विक्रम उंडे, विशेष शिक्षिका ज्योती भवारी, निदेशक सुशीला गायकवाड, विजय बळीद, अल्लाउद्दीन शेख, अशोक सत्रे, बाळू मकरंद यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. क्षितिज तांबोळी हे अनुभवी नेत्रतज्ज्ञ असून, मागील एका वर्षात त्यांनी 40 हून अधिक मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेऊन गरजू रुग्णांना सेवा दिली आहे. त्यांनी बेंगळुरू, हैदराबाद, नाशिक यांसारख्या शहरांतील नामांकित संस्थांमध्ये कार्य केले असून, गेल्या वर्षभरापासून ते अहिल्यानगर येथे सेवा देत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे सातत्यपूर्ण मोफत मार्गदर्शन लाभत आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांनी पालकांशी संवाद साधत दिव्यांग मुलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्या, वयात येण्याच्या टप्प्यातील शारीरिक व मानसिक बदल, तसेच लैंगिक शिक्षणाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित पालकांनी विचारलेल्या शंकांचे समाधानकारक निराकरण करून त्यांनी पालकांना योग्य मार्गदर्शन दिले.


केंद्र प्रमुख भाऊसाहेब कदम म्हणाले की, दिव्यांग मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नेत्र तपासणीसारखा मूलभूत आरोग्य विषय अनेकदा दुर्लक्षित राहतो. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य तपासले गेले, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्य ठेवण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्याध्यापिका पुष्पा म्हातारदेव-बनकर म्हणाल्या की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्याची सांगड आवश्‍यक आहे. नेत्र तपासणीमुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीदोषांचा वेळीच शोध लागतो आणि त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत होणारे अडथळे दूर होतात. पालकांनीही अशा शिबिरांना सक्रिय प्रतिसाद देऊन मुलांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *