आदिवासी बांधवांसाठी आरोग्य सेवा आणि वस्त्रवाटप
शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचणे ही काळाची गरज -डॉ. संतोष गिऱ्हे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने उमंग फाऊंडेशनच्या वतीने आगडगाव (ता. नगर) येथील आदिवासी वस्तीवर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासोबतच गरजू महिला व पुरुषांना कपड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविण्यात आले. या उपक्रमाला आदिवासी समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आदिवासी समाजामध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे, प्राथमिक आरोग्य तपासणीद्वारे विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि गरजू कुटुंबांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी ॲड. पोपट बनकर, राम कराळे, शाहीर कान्हू सूंबे, सरपंच परमेश्वर पालवे, सौ. वैशाली कुलकर्णी, कावेरी भिंगारदिवे, गणेश कदम, भीमराज भिंगारदिवे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब ठोंबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. संतोष गिऱ्हे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचणे ही काळाची गरज आहे. विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार, आरोग्य तपासणी आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा आरोग्याविषयी जागरूकतेच्या अभावामुळे किरकोळ आजारही गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून केवळ तपासणीच नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृतीही केली जात आहे. समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून उमंग फाऊंडेशन भविष्यातही आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच परमेश्वर पालवे म्हणाले की, गावातील आदिवासी बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गावपातळीवर अशा प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा थेट लाभ झाला. उमंग फाऊंडेशनने दाखविलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यातही अशा उपक्रमांना ग्रामपंचायतीचे पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छतेचे महत्त्व, संतुलित आहार, महिलांचे आरोग्य आणि हंगामी आजारांपासून बचाव याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांची तपासणी डॉ. संतोष गिऱ्हे यांनी केली.
आरोग्य शिबिरानंतर गरजू महिला व पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला. सामाजिक उत्तरदायित्व जपत आरोग्य सेवा आणि मदतीचा हात आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न उमंग फाऊंडेशनने केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विभावरी विळदकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

