• Fri. Feb 27th, 2026

शहरात मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

ByMirror

Feb 27, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचा संयुक्त उपक्रम


सायबर सिक्युरिटी व डिजिटल मार्केटिंगवर भर; लाभार्थींना सहभागी होण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना तांत्रिक कौशल्यांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन महिन्यांच्या कालावधीचा अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या प्रशिक्षणामध्ये सायबर सिक्युरिटी ॲण्ड डेटाबेस रिकव्हरी तसेच डिजिटल मार्केटिंग या अत्याधुनिक आणि रोजगाराभिमुख विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रात युवकांना सक्षम बनवणे आणि त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या आधारे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास किंवा नोकरी मिळविण्यास सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये म्हणजे या कार्यक्रमात केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर उद्योजकीय कौशल्यांवरही विशेष भर दिला जाणार आहे. त्यामध्ये उद्योग उभारणीची प्रक्रिया, शासकीय कर्ज व अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे तंत्र, विक्री कौशल्य व उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, कर कायदे व परवाने (लायसन) यासंबंधी माहिती, तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे सहभागी युवकांना व्यवहार्य व उपयुक्त ज्ञान मिळणार आहे.


प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी वय 18 ते 45 वर्षे, अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्‍यक, किमान दहावी उत्तीर्ण, मागील 15 वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी, स्वयंरोजगार किंवा रोजगार करण्याची तयारीची अट आहे. यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला, अंतिम सत्राची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला हे आवश्‍यक कागदपत्रे लागणार आहे.


इच्छुकांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा. अमोल गव्हाणे व तेजस वैद्य (कार्यक्रम आयोजक) यांच्याशी 9730876783 / 8237232433 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच एमसीईडीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mced.co.in/Barti या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करता येईल. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे प्रकल्पाधिकारी दिलावर सय्यद व महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *