आरोपी अद्याप मोकाट; फिर्याद मागे घेण्यासाठी धमक्यांचा आरोप
आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास पिडीतेच्या कुटुंबीयांचा उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. आरोपी सतत घरी येऊन फिर्याद मागे घेण्यासाठी धमक्या देत असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी रोहण अशोक बोरुडे (रा. रामडोह, ता. नेवासा) याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात दि. 27 जानेवारी 2026 रोजी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अत्याचारानंतर पीडित मुलीवर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारादरम्यानच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मात्र, गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपीचा स्वभाव गुन्हेगारी स्वरूपाचा असून तो मोकाट असल्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे मुलीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. फिर्याद मागे घेण्याच्या दबावासाठी आरोपी दोन ते तीन वेळा घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. न्याय मिळावा आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात आली नाही, तर कुटुंबीयांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 4 मार्च पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित मुलीने दिला आहे.
