• Sun. Feb 22nd, 2026

निमगाव वाघा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची पदयात्रा उत्साहात

ByMirror

Feb 22, 2026

ढोल-ताशांच्या गजरात महाराजांचा जयघोष; लेझिमच्या तालबद्ध डावाने व पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष


विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावेत -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पदयात्रा काढून महाराजांना अभिवादन करण्यात आले. गावातील मुख्य मार्गांवरून पार पडलेल्या या पदयात्रेत देशभक्तीचा आणि शिवभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात नवनाथ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात पदयात्रेला प्रारंभ झाला. मुलींच्या लेझिम पथकाने सादर केलेल्या तालबद्ध डावाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. तर विद्यार्थ्यांनी हातात भगवे ध्वज आणि घोषवाक्यांचे फलक घेऊन “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.


पारंपरिक पद्धतीने साकारलेली ही मिरवणूक गावकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ तसेच शिवकालीन सरदारांच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता. या वेशभूषेमुळे शिवकालीन इतिहास जणू प्रत्यक्ष अनुभवायला मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या जयंती सोहळ्यात ग्रामपंचायत सदस्य तथा डोफ्लगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, शरद भोस, स्वाती इथापे, प्रमोद थिटे, आप्पासाहेब कदम, तुकाराम पवार, संजय जपकर आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, शिवजयंतीचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक व्यापक होत आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि विचारांचा जागर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी करताना केवळ जल्लोष न करता शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा पुस्तक वाचून शिवरायांचे कार्य जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजासमोर आदर्श ठेवणारी पिढी घडवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या शिस्तबद्ध सहभागाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होऊन आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची अनुभूती मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष व रमेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा यशस्वीपणे पार पडली. गावातील विविध भागांतून मार्गक्रमण करत पदयात्रेचा समारोप नवनाथ विद्यालयात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *