• Fri. Feb 6th, 2026

नगरकल्याण रोडवरील मोफत सर्व रोगनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Feb 5, 2026

जपानी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक मशिनरीद्वारे संपूर्ण शरीर तपासणी


“आरोग्य म्हणजे संपत्ती” -पंडितराव गुरूजी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड परिसरात पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था, आधार शक्ती बचत गट, सेफ टी इंडस्ट्रीज व माय लाईफस्टाईल मार्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोगनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जपानी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली.


नगर-कल्याण रोडवरील फॅमिली विश्‍व मॉल येथे भरलेल्या या शिबिराचे उद्घाटन पंडितराव गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेफ टी इंडस्ट्रीजचे चेअरमन परशुराम कोतकर होते. यावेळी पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ, प्रा. भगवान काटे, राजाराम रोहकले सर, मेजर पर्वतराव हराळ, अनिता शिवाजी वेताळ, आंधळे सर यांच्यासह सुधाकर सिनारे, विशाल गायकवाड, पवन ठाणगे, रावसाहेब सोनवणे, उत्तम राजळे, जयश्री गायकवाड, रुपाली बोडखे तसेच आरोग्यतज्ज्ञ डॉ. पटेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात प्रा. भगवान काटे यांनी सांगितले की, समाजाच्या आरोग्यवृद्धीसाठी विविध ठिकाणी सातत्याने मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जात असून, गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम समाजासाठी अत्यंत आवश्‍यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


उद्घाटनप्रसंगी बोलताना पंडितराव गुरूजी म्हणाले की, “आरोग्य म्हणजे खरी संपत्ती आहे.” मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत मोफत सर्व रोगनिदान शिबिरे ही समाजासाठी मोठा आधार ठरत आहेत. वेळेवर आजाराचे निदान झाल्यास गंभीर आजारही सहज टाळता येतात, असे त्यांनी सांगितले.


या शिबिरामध्ये रक्तदाब, साखर, हिमोग्लोबिन, हृदय तपासणी, हाडांची घनता, यकृत कार्यक्षमता, फुफ्फुस तपासणी, वजन, बीएमआय आदी विविध चाचण्या करण्यात आल्या. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
आरोग्यविषयक उपयुक्त माहिती राजाराम रोहकले व मेजर पर्वतराव हराळ यांनी दिली. तर डॉ. पटेकर यांनी सदृढ व निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर शिवाजी वेताळ यांनी केले, तर आभारप्रदर्शन आंधळे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *