• Fri. Feb 6th, 2026

जागतिक कर्करोग जनजागृती सप्ताहाचा अहिल्यानगरमध्ये उत्साहात शुभारंभ

ByMirror

Feb 5, 2026

जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती कार्यक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


योग्य वेळी निदान व उपचार केल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो -संजय गुगळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगर, महापालिकेचे जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अजय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग (कॅन्सर) जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिकेच्या जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या कार्यक्रमात नागरिकांना कर्करोगाविषयी सखोल माहिती देण्यात आली.


या जनजागृती सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी कर्करोग तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे लिखित कॅन्सरविषयक माहितीपूर्ण पुस्तकांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर तपासणीचे महत्त्व आणि उपचार पद्धती याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी जायंट्‌स ग्रुपचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी कर्करोगाबाबत बोलताना सांगितले की, “कॅन्सरचे योग्य वेळी निदान व उपचार झाले, तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. साधारणतः 40 टक्के कर्करोग हे तंबाखू व तत्सम व्यसनांमुळे होत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्‍यक आहे.” कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याबाबत सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.


अजय फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती विद्या तन्वर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या पतींचे निधन कॅन्सरमुळे झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कॅन्सरविरोधी जनजागृतीचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. स्वतःच्या आयुष्यातील अनुभव इतरांना या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रेरणादायी ठरावेत, हा आमचा उद्देश आहे.” कॅन्सर रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचे कार्यही फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.


या कार्यक्रमाला महापालिका आरोग्य विभागाच्या डॉ. सौ. आयेशा शेख, रीना पवार, सौ. नूतन गुगळे, जायंट्‌स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, अनिल गांधी, अभय मुथा, डॉ. विनय शहा, तसेच जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सिस्टर मनोरमा थोरात, माला साळवे, ज्योती तिवारी, सुरेखा डिके, रेखा गावंडे, आशा तांबे, दिक्षा पगारे, आशा सेविका अनिता तिवारी, प्रिया इंगळे, दुर्गा चंद्रे, पल्लवी बिडकर, निर्मला राठौर, सोनाली पालवे, अंजू रासकर, विद्या फुलसौंदर, प्रभाग समिती क्रमांक 4 मधील महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *