• Thu. Feb 5th, 2026

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा संयुक्त माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

ByMirror

Feb 5, 2026

आठवणींना उजाळा, शाळेच्या विकासाचा संकल्प; माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवड


विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थिनी शाळेत पुन्हा एकवटल्या

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा संयुक्त माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. अनेक वर्षांनंतर शाळेच्या प्रांगणात एकत्र आलेल्या माजी विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. हसत-खेळत, कधी भावुक होत जुन्या मैत्रिणींनी बालपण पुन्हा जगल्याचा अनुभव व्यक्त केला.


या मेळाव्यातून माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थिनी व अहिल्यानगरच्या प्रथम महिला महापौर शिलाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी विद्यार्थिनी असलेल्या महिला पत्रकार प्रियंका चिखले, औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाच्या माजी न्यायाधीश उमाताई संतोष बोरा, आशाताई जाधव, ज्योतीताई मोकळ, प्राचार्या सौ. छायाताई काकडे व मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मीताई आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबार्इ भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मीनाक्षी खोडदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे सर यांनी माजी विद्यार्थ्यांची माहिती देत माजी विद्यार्थी संघात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्वानुमते माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली.
प्रमुख पाहुण्या शिलाताई शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “या शाळेनेच मला जीवनात भरारी घेण्याचा आत्मविश्‍वास दिला. ज्या शाळेत शिकून घडलो, त्या शाळेसाठी आज माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून काहीतरी करण्याची संधी मिळते आहे, याचा मला अभिमान आहे. पुन्हा शाळेत येताना वेगळाच आनंद आणि समाधान मिळत आहे.”
यावेळी प्रियंका चिखले, उमाताई संतोष बोरा व आशाताई जाधव यांनीही आपल्या भावना व्यक्त करत “शाळेनेच आम्हाला जीवनाची दिशा दिली” असे सांगितले.


अध्यक्षीय भाषणात ज्ञानदेवराव पांडुळे म्हणाले की, “लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय हे केवळ शिक्षण देणारे ठिकाण नसून, विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी एक संस्कारांची शाळा आहे. आज येथे एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी हे या शाळेचे जिवंत वैभव आहेत. माजी विद्यार्थी संघ म्हणजे केवळ नावापुरती संस्था नसून, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारी ताकद आहे. शैक्षणिक सुविधा वाढविणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, शाळेच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे आणि शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक दृढ करणे, ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी विद्यार्थी संघाची भूमिका स्पष्ट करत शाळेसाठी उत्कृष्ट व प्रेरणादायी कार्य करण्याचे आवाहन केले.


मेळाव्यादरम्यान उपस्थित माजी विद्यार्थिनींनी आपल्या अनुभवांचे कथन करत जुन्या आठवणी सांगितल्या. विशेष म्हणजे विद्यालयाच्या प्रांगणात लहानपणी खेळले जाणारे पारंपरिक खेळ पुन्हा खेळून बालपण पुन्हा जगल्याचा आनंद त्यांनी घेतला. यावेळी वैशाली कळसकर, उषा कटारिया, उमा धुपधरे, गिरीजा पवार, शेख फरजाना, नीता रासने, सुरेखा निमकर, शेख शदाब, मनीषा आरडे, सुनिता कानडे, सोनाली पोखरणा आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. जी. पिसाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *