• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंची भरारी

ByMirror

Nov 29, 2025
Oplus_131072

ओम दंडवते, प्रदीप सिंग यांची महाराष्ट्र वरिष्ठ संघ निवड कॅम्पसाठी


तर हर्षद सोनवणे अंडर-13 ‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतिम फेरीत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दोन उभरते फुटबॉलपटू ओम दंडवते आणि प्रदीप सिंग यांची महाराष्ट्र राज्य (डब्ल्यूआयएफए) वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाच्या संतोष ट्रॉफी 2025-26 पूर्वतयारी कोचिंग कॅम्प व सिलेक्शन ट्रायल्ससाठी निवड झाली आहे. तसेच शहरातील आणखी एक होनहार खेळाडू हर्षद सोनवणे याची ‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत होणाऱ्या अंडर-13 अंतिम निवड चाचणीसाठी निवड झाली असल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनप फर्नांडिस यांनी दिली.


हिंगोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत ओम दंडवते आणि प्रदीप सिंग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य पातळीवरील प्रशिक्षक आणि निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या खेळामुळेच त्यांना या प्रतिष्ठेच्या प्री-कॅम्पसाठी पात्रता मिळाली आहे. मुंबईतील कॉपरेज फुटबॉल मैदानावर 23 नोव्हेंबर 2025 पासून वरिष्ठ गटाचा कॅम्प सुरू होणार आहे. त्यानंतर 17 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान जयपूर, राजस्थान येथे पार पडणाऱ्या संतोष ट्रॉफीच्या गट-अ फेरीसाठी महाराष्ट्र संघाची तयारी केली जाणार आहे.


राज्यातील फुटबॉल प्रतिभा-विकासातील सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत अंडर-13 मुलांची अंतिम निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2025 पासून सेंटर ऑफ एक्सलन्स, खारघर येथे होणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश राज्यभरातील सर्वोत्तम 13 वर्षांखालील मुलामुलींची निवड करून त्यांना 5 वर्षांची शैक्षणिक व प्रगत फुटबॉल प्रशिक्षण शिष्यवृत्ती देणे हा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 60 मुलांना या अंतिम टप्प्यासाठी बोलावण्यात आले असून त्यातून 30 जणांची अंतिम निवड होणार आहे. यात अहमदनगरचा हर्षद सोनवणे आपले कौशल्य सिद्ध करण्यास सज्ज झाला आहे.


निवड झालेल्या तिन्ही खेळाडूंना जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगसिंगह मिन्हास, अमरजीतसिंग साही, खजिनदार रिश्‍मलसिंग परमार, तसेच संयुक्त सचिव प्रदीपकुमार जाधव आणि व्हिक्टर जोसेफ यांनी अभिनंदन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *