• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

घर-घर लंगर सेवेच्या माध्यमातून शहरातील गोशाळांना पशुखाद्याचे वाटप

ByMirror

Nov 22, 2025
घर-घर लंगर सेवेच्या माध्यमातून शहरातील गोशाळांना पशुखाद्याचे वाटप

गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या पुण्यतिथी निमित्त पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीची सांगता


गुरु तेग बहादुरजींनी धर्मांतर विरोधातील बलिदानाचा धगधगता इतिहास प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर-घर लंगर सेवेच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या सर्वसमावेशक मदत उपक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. गुरु तेग बहादुरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या 350 वर्षांच्या स्मृतिदिनी या उपक्रमाची सांगता करत शहरातील गोशाळांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले.


आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शहरातील विविध गोशाळांना पशुखाद्याचे वितरण करण्यात आले. तारकपूर येथील घर-घर लंगर सेवेच्या अन्नछत्रालयात आयोजित कार्यक्रमात जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, अमोल गाडे, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, मुन्ना जग्गी, प्रशांत मनोत, जय रंगलानी, कैलाश नवलानी, सोमनाथ चिंतामणी, सुनील थोरात, जगजीतसिंग गंभीर, राजू जग्गी, अनिश आहुजा, राजा नारंग, संजय आहुजा, किशोर खुराणा, प्रीतमसिंग धीलो तसेच माऊली गोशाळेचे प्रसाद शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शीख धर्मातील नववे गुरु गुरु तेग बहादुरजी यांनी धर्मसंरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. धर्माकरिता योगदान देऊन धर्मांतर विरोधात ते उभे राहिले. त्यांच्या बलिदानाचा धगधगता इतिहास प्रेरणादायी आहे. या विचारांना उजाळा देण्यासाठी त्यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. घर-घर लंगर सेवेने कोरोना काळात भुकेल्यांच्या सेवेसाठी अपार परिश्रम घेतले; ही सेवा आजही तितक्याच ताकदीने कार्यरत आहे. संकटाच्या प्रत्येक काळात श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान समाजाच्या पाठीशी उभा राहतो, ही लंगर परंपरेची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.


श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंजाब आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत साहित्य पाठविण्यात आले. यामध्ये 15 टन पशुखाद्य, 10 हजार व्यक्तींसाठी कपडे, 200 कुटुंबीयांना गृहपयोगी भांडी, 100 विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक साहित्य व 3 गावांना पुरेल इतकी प्राथमिक उपचारांची औषध किट्‌सचा समावेश होता. या सर्व मदतीत नगरकरांनीही मोठा हातभार लावला असल्याचे आयोजकांनी सांगितले.


कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून घर-घर लंगर सेवा भुकेल्यांना अन्न, गरजू कुटुंबांना धीर आणि संकटात लोकांना साथ देत सतत कार्यरत आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीची सांगता करताना, गुरु परंपरेचा सेवा-समर्पणाचा संदेश देण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *