लष्करी जवानांच्या हस्ते ध्वजारोहण
शंभर टक्के निकालाबद्दल मुख्याध्यापकांचा ग्रामस्थांतर्फे विशेष सन्मान
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात सकाळी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याला ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणाचा मान सैन्य दलातील नायक नाना आंबेकर व रविंद्र उरमुडे यांना मिळाला. त्यांनी तिरंगा फडकावताना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवराम कोल्हे होते. यावेळी गावचे सरपंच बाबा टाकले, राजेश बोरकर, अशोक मुठे, कवडेश्वर आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नाना वाटोळे, किशोर सूर्यवंशी, ठकाराम टकले, अमोल टकले, बबन उरमुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात इयत्ता 10 वी मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच नगर तालुका क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापक हबीब शेख यांचा ग्रामस्थांतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक लगड यांचाही सत्कार झाला.
देवराम कोल्हे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. या तिरंग्याखाली उभे राहून प्रत्येकाने देशसेवेची शपथ घेतली पाहिजे. शिक्षणासोबतच खेळ, कला, शिस्त आणि प्रामाणिकपणा या मूल्यांना जीवनात स्थान दिले, तरच खऱ्या अर्थाने देशभक्त नागरिक घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक हबीब शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांवर भर दिला जात आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच विद्यालय सातत्याने प्रगती करत असून, येत्या काळात आणखी अनेक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास शालेय शिक्षक संजय गोसावी, सतीश मुसळे, शिवाजी धस, रामदास साबळे, सुनीता दिघे, अशोक टकले, मनीषा वाठोळे, संदीप भवर, शिक्षकेतर अरुण उरमुडे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण भारून गेले होते. आजी-माजी सैनिक संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
