• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

छावणी परिषद शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Jan 29, 2025
देश उभारणीचे काम शाळांमधून होत आहे -ब्रिगेडीयर रस्सेल डीसूजा

देश उभारणीचे काम शाळांमधून होत आहे -ब्रिगेडीयर रस्सेल डीसूजा

सांस्कृतिक कार्यक्रमात सिमेवर लढणाऱ्या भारत मातेच्या वीरसुपूत्रांच्या आठवणी केल्या जागृक; नमस्तुते परमशक्तीचे दर्शन

नगर (प्रतिनिधी)- शाळेतून जीवनाची उमेद व दिशा मिळते. देश उभारणीचे काम शाळांमधून होत आहे. शाळेच्या माध्यमातून विविध अधिकारी व नागरिक घडून सक्षम भारत घडवित आहेत . छावणी परिषदने गुणवत्तेबाबत घेतलेली आघाडी अभिमानास्पद आहे. सर्वसामान्यांची मुले येथे शिकत असून, संस्कार, देश प्रेम व गुणवत्तेच्या शिदोरीने शाळेच्या सुरु असलेल्या कार्याचे ब्रिगेडीयर रस्सेल डीसूजा यांनी कौतुक केले.


छावणी परिषद शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ब्रिगेडीयर डीसूजा बोलत होते. याप्रसंगी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, छावणी परिषदेचे सदस्य वसंत राठोड, कोटक बँकेचे एरिया मॅनेजर सचिन देशमुख, कोटक बँकेचे सर्कल मॅनेजर शैलेश डांगे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, समग्र शिक्षाचे जिल्हा लेखाधिकारी रमेश कासार, सीएसआर बॉक्स व भारत केअर्सचे अक्षय शितोळे, मुख्याध्यापक संजय शिंदे, राजू भोसले, मुबीना सय्यद आदी उपस्थित होते.


प्रारंभी सरस्वती पूजन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ब्रिगेडीयर डीसूजा यांच्यासह पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी भरविलेल्या बाल आनंद मेळावा व गणित-विज्ञान, पर्यावरण प्रदर्शनाला भेट देवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.


प्रास्ताविकात संजय शिंदे म्हणाले की, छावणी परिषदेच्या शाळेने भौतिक सुविधांबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला आहे. इयत्ता दुसरीपासून सुरु केलेल्या मिशन स्कॉलरशिप उपक्रमामुळे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत आहेत. पीएमश्री योजनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद शाळेचा समावेश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,मोफत शैक्षणिक सहल अशा अनेक उपक्रमांकारिता निधी प्राप्त होणार असल्याचे सांगितले. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा, शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सादर केला.


सचिन देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला आनंद हा समाधान देणारा आहे. भविष्याचा वेध घेऊन विद्यार्थ्यांमध्ये उमेद निर्माण करण्याचे काम शाळेच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले.
प्रताप पाटील म्हणाले की, छावणी परिषद शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असून, याच शाळेत शालेय शिक्षण घेऊन अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे शाळेप्रती कृतज्ञतेची भावना ठेवून शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून शाळेचा विकास कसा करता येईल? यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे या शाळेसह व शहराशी भावनिक नाते जोडलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्त्री निर्मित ब्रम्हा, विष्णू, महेश या सृष्टी रचतेतांवर नमस्तुते परमशक्ती… या गीताद्वारे नारी शक्तीचे दर्शन घडविण्यात आले. सिमेवर लढणाऱ्या जवानांप्रती विविध गीत सादर करुन, देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना सलाम करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमातून सिमेवर लढणाऱ्या भारत मातेच्या वीरसुपूत्रांच्या आठवणी जागृक करण्यात आल्या त्या पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, स्कूल चले हम…, चंदा ने पूछा तारो से…, बरसो रे मेघा आदी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली. शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर गीत सादर करुन स्वराज्य निर्मितीचे प्रसंग विद्यार्थ्यांनी जिवंत केले. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा साठे व स्नेहल लवांडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांशा परदेशी व अक्षरा तोरडी या विद्यार्थीनींनी केले. आभार मुबीना सय्यद यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *