युवक-युवतींनी नृत्य स्पर्धेतून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
पारंपारिक लोककलेतून सामाजिक जागृती
नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात पारंपारिक लोककलेचे सादरीकरण करण्यात आले. तर युवक-युवतींनी नृत्य स्पर्धेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. महिलांनी सादर केलेल्या पारंपारिक मंगलगौरच्या सादरीकरणाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
तसेच या महोत्सवात शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, मेंहदी, हस्ताक्षर स्पर्धा रंगली होती. राष्ट्रीय युवा सप्ताहनिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र व महापालिकेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एक हजार पेक्षा अधिक युवक-युवतींचा सहभाग लाभला.
निबंध स्पर्धेत सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले परखड मत मांडले. तर वक्तृत्व स्पर्धेतून समाजातील गंभीर प्रश्नांवर बोट ठेऊन नागरी कर्तव्य म्हणून भूमिका बजावण्याचे नागरिकांना आवाहन केले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध भारतीय संस्कृती, निसर्ग वैभव आपल्या चित्रातून रेखाटले होते. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांमधून सुंदर हस्ताक्षराचे नमुने विद्यार्थ्यांनी सादर केले.

देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गीतांवर वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा रंगली होती. नृत्य स्पर्धेतून युवक-युवतींनी एकच जल्लोष केला. तर मेंहदी स्पर्धेत महिलांचा उत्साह दिसून आला. शिंगवे नाईक महिला मंडळाने मंगळगौरचा खेळ व नृत्याचे सादरीकरण केले.
पारंपारिक लोककलेच्या सादरीकरणाप्रसंगी मंदाताई फुलसौंदर यांनी प्रबोधनपर गीते सादर केली. स्वप्नील गायकवाड यांनी भेदिक कला, प्रकाश शिंदे यांनी बहुरूपी व दत्तू वाजे यांनी वाघ्या मुरळीचे दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. संपत ससे व नारायण ससे यांनी भजनी मंडळाद्वारे तर शाहीर कान्हू सुंबे यांनी शाहिरी पोवाड्यातून सामाजिक विषयांवर जागृती केली.
या स्पर्धेत ऑक्झिलियम हायस्कूल, पेमराज गुगळे हायस्कूल, शासकीय परिचर्या महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, बटरफ्लाय नर्सरी व शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे परीक्षण अनंत द्रविड, गायत्री गुंड, विकास घोगरे, सचिन साळवी, अनिल साळवे, दिनेश शिंदे, शाहीर कान्हू सुंबे, कावेरी कैदके, रजनी ताठे, अमोल तांबडे यांनी परीक्षण केले.
–
सावित्री ज्योती महोत्सवातील विविध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
निबंध स्पर्धा प्रथम- समीक्षा सवाई, द्वितीय- खंडू फुंदे, तृतीय- अंकिता निमसे.
चित्रकला स्पर्धा प्रथम- ऋतुजा शिंदे, द्वितीय- देवयानी काटे, तृतीय- जयश्री कोल्हे.
हस्ताक्षर स्पर्धा प्रथम- भूषण कैदके, द्वितीय- प्रीती खैरे, तृतीय- श्रद्धा गायकवाड.
वक्तृत्व स्पर्धा प्रथम- सानिका खैरे, द्वितीय- प्रिया झपके, तृतीय- संस्कृती कोतवाल.
वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रथम- सौरभ खताडे, द्वितीय- राजेश्वरी किल्लोर, तृतीय- श्रुती खळदकर.
समूह नृत्य स्पर्धा प्रथम- ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, द्वितीय- शासकीय परिचर्या महाविद्यालय, तृतीय- शिंगवे नाईक महिला मंडळ.
मेहंदी स्पर्धा प्रथम- समीक्षा सवाई, द्वितीय- हर्षदा ढगे.
–