• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

लिलाबाई झोडगे यांना फिनिक्सचा सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार प्रदान

ByMirror

Jan 2, 2025
लिलाबाई झोडगे यांना फिनिक्सचा सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार प्रदान

महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंच्या विचाराने मुलांवर संस्कार रुजवावे -पद्मश्री पोपट पवार

नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भिंगार येथील श्रीमती लिलाबाई भाऊसाहेब झोडगे यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले.
शुक्लेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या शिव पुराण कथेच्या कार्यक्रमात लिलाबाई झोडगे यांना पद्मश्री पोपटराव पवार व ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश संघचालक नानासाहेब जाधव, उद्योजक महेश झोडगे, अण्णा चौधरी, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते.


लिलाबाई झोडगे या सर्वसामान्य कुटुंबातून येवून पतीच्या निधनानंतर बिकट परिस्थितीत भाजी विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या मुलाला चांगले शिक्षण व संस्कार देऊन उद्योजक म्हणून घडविले. त्या सामाजिक व धार्मिक कार्यात सातत्याने योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य उद्योजक महेश झोडगे करत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने त्यांनी मुलांना सुशिक्षित करुन घडविले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.


महिला समाज घडविण्याचे कार्य करतात. महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंच्या विचाराने मुलांवर संस्कार रुजविण्याची गरज आहे. लिलाबाई झोडगे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी झोडगे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राकेश ताठे, राजेंद्र बोरुडे, प्रतिक चौधरी, सागर निमसे, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, अमित महाराज धाडगे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *