• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

साकळाई योजनेसाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा आक्रोश सूर्यनामा

ByMirror

Oct 28, 2024
साकळाई योजनेसाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा आक्रोश सूर्यनामा

तीस वर्षे सत्ता भोगलेल्या घराणेशाहीला कोलदांडा देण्याचे आवाहन

शब्द पाळण्याची कुवत नसलेल्यांना सत्तेपासून लांब ठेवा -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या नावाखाली फक्त राजकारण करुन घराणेशाही पोसणाऱ्यांना जाब विचारुन साकळाई उपसा जलसिंचन कृती समिती, भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने चिखली (ता. श्रीगोंदा) येथे सदर योजनेच्या लाभार्थी गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी रविवारी (दि.27 ऑक्टोबर) आक्रोश सूर्यनामा केला. गेली तीस वर्षे सत्ता भोगलेल्या घराणेशाहीला कोलदांडा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


साकळाई उपसा जलसिंचन आक्रोश सूर्यनाम्यात साकळाई मावळ्यांनी शपथ घेऊन गेल्या 30 वर्षात अनेक वेळेस ज्यांना निवडून आणले त्यांनी ही योजना राबवली नाही. त्यामुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत अशा दादा, बापू यांच्या कुटुंबातील कोणालाही निवडून देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. या योजनेचे लाभार्थी असलेले श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील हिवरेझरे, चिखली, कोरेगाव, मांडवगण, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी, रुईछत्तीसी, गुणवडी, गुंडेगाव, वाटेफळ, खुंटेफळ, कोयाळ, मठपिंपरी आदी गावांमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घराणेशाहीला कोलदांडा देण्याचा इशारा दिला आहे.


यावेळी लोकशाही डिच्चू कावा व लोकशाही डिच्चू फत्तेच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये अशोक सब्बन, ॲड. कारभारी गवळी, साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, रोहिदास उदमले, डॉ. योगेंद्र खाकाळ, अशोक झेंडे, अनिल मगर, नारायण रोडे, प्रतापराव नलगे, अमोल लंके, वीरबहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, ॲड. भास्कर ओढावर, बापू गाडेकर, रामदास झेंडे आदी सहभागी झाले होते.


अशोक सब्बन म्हणाले की, सर्वसामान्यांची कामे करणाऱ्या चांगल्या लोकप्रतिनिधीला लोकशाहीमध्ये संधी देण्याची गरज आहे. ज्यांचे सोने खोटे निघाले, त्यांच्यावर गुंतवणूक करणे म्हणजे लोकशाहीचा आत्मघात ठरणार असल्याचे सांगितले. बाबा महाराज झेंडे यांनी चाळीस गावातील लोकांना जागे होण्याची वेळ आली आहे. आज गप्प बसल्यास भविष्यातील येणारी पिढी माफ करणार नसल्याची भावना व्यक्त केली.


ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, ज्यांच्या मध्ये दिलेला शब्द पाळण्याची कुवत नाही, त्यांना सत्तेपासून लांब ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या तंत्राचा वापर केला. परंतु सध्या लोकप्रतिनिधी लोकमकात्या म्हणजे लोकांच्या प्रश्‍नाबद्दल मला काय त्याचे? असे म्हणून सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या मागे लागतात. त्यातून सर्वसामान्यांची कामे न करता फक्त स्वत:ची घरे भरण्याचे काम सत्तापेंढारी यांनी केले असून, त्यांना सत्तेतून पायउतार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


घोड प्रकल्पातून 2 पीएमसी पाणी नक्की साकळाई योजनेसाठी उपलब्ध होऊ शकते. घोड प्रकल्पामध्ये आणखी 3 टीएमसी पाणी शिल्लक आहे. कुकडीच्या लाभार्थ्यांना गेल्या 30 वर्षापेक्षा जास्त काळ वर्षभर पाणी मिळते, परंतु दुष्काळी भागाला ठिबक पद्धतीने देण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. यातून लाखो शेतकऱ्यांना लाभ नाकारला जात आहे. यापूर्वी शेतकरी भोळेपणाने पुढाऱ्यांच्या म्हणण्यावर विश्‍वास ठेवत होते. त्यातून घराणेशाही निर्माण झाली आणि लोकशाहीचे सरांजमशाहीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोंबडी, दारू, पैसा, जात याच्या आहारी जाऊ नये आणि जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राने कायमचे संपवून टाकण्यासाठी संघटनेने भूमिका घेतली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *