• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अनुकंपा धारक शिपाई पदासाठी असलेल्या उमेदवारांचे मुलाबाळांसह उपोषण

ByMirror

Sep 26, 2024
अनुकंपा धारक शिपाई पदासाठी असलेल्या उमेदवारांचे मुलाबाळांसह उपोषण

शिक्षक दरबारात आश्‍वासन देऊनही शिक्षणाधिकारी यांनी फेटाळले प्रस्ताव

अनुकंपा धारकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दरबारात आठ दिवसात नियुक्तीचे आदेश देण्याचे आश्‍वासन देऊनही संस्थेकडे प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याने अनुकंपा धारक शिपाई पदासाठी असलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागासमोर मुलाबाळांसह उपोषण सुरु केले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला असताना, नियुक्तीसाठी सुरु असलेली टोलवाटोलवी थांबवून मान्यता देण्याची मागणी उपोषणकर्ते अनुकंप धारक लाभार्थींनी केली आहे.


या उपोषणात शासुंदर शेळके, अविनाश अमृते, आकांक्षा शेलार, पुनम शिंदे, केतन जमधडे, गौरव साळवे आदी अनुकंपाधारक शिपाई वर्ग सहभागी झाले होते. या उपोषणस्थळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.


सर्व अनुकंपा धारक शिपाई यांचे माध्यमिक शिक्षक विभागाकडे 9 महिन्यांपासून प्रस्ताव प्रलंबित आहे. शिक्षण अधिकारी यांना वारंवार विनंती करुन, स्मरणपत्र दिलेले आहेत. तरी शिक्षण अधिकारी यांनी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


12 सप्टेंबर रोजी शिक्षक आमदार किशोर दराडे व शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांच्या उपस्थितीमध्ये शहरात झालेल्या शिक्षक दरबारात अनुकंपा धारक शिपाई यांना मान्यता देण्याचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्‍नाला उत्तर म्हणून शिक्षण अधिकारी यांनी 8 दिवसात मान्यता देण्याची हमी लाभार्थींना दिली होती. तरी देखील शिक्षणाधिकारी यांनी मान्यता न देता, प्रस्ताव संस्थेकडे फेटाळून लावल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. प्रस्ताव फेटाळायचे होते, तर मग नऊ महिने आमचे प्रस्ताव का प्रलंबित ठेवले? असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करुन सर्व अनुकंपा धारक मुलाबाळांसह उपोषणास बसले आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *