• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

मुलींमध्ये रायगड व मुलांमध्ये पालघर संघाने पटकाविले विजेतेपद

ByMirror

Jul 10, 2024
मुलींमध्ये रायगड व मुलांमध्ये पालघर संघाने पटकाविले विजेतेपद

17 वर्षा आतील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा चुरशीच्या सामान्यांनी चांगलीच रंगली.

17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सांघिक स्पर्धेत मुलींमध्ये रायगड व मुलांमध्ये पालघर संघाने विजेतेपद पटकाविले. मंगळवार (दि.9 जुलै) पासून 15 वर्ष आतील मुले व मुलींची वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले खेळाडू उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करत आहे.


17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सांघिक स्पर्धेचे अंतिम सामने सोमवारी संध्याकाळी पार पडले. असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी, खजिनदार राहुल मोटे, असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य मिलिंद कुलकर्णी, डॉ. भुषण अनभुले, स्पर्धा समिती सदस्य मयुर घाटणेकर, मनोज कान्हेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम सामन्यांना प्रारंभ करण्यात आले.


मुलींच्या संघात पुणे संघाने कोल्हापूर, मुंबई उपनगर व नागपूर संघाला पराभूत करुन अंतिम फेरी गाठली. तर रायगड संघाने जळगाव, नाशिक व ठाणे संघाला पराभूत करुन अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामना पुणे विरुध्द रायगड यांच्यात रंगला होता. यामध्ये युतिका चव्हाण (पुणे) विरुध्द प्रकिर्ती शर्मा (रायगड) यांच्यातील सामन्यात तीन सेटमध्ये 21-15, 8-21, 17-21 ने रायगडची प्रकिर्ती शर्माने विजय मिळवला.

हा सामना पाऊणतास रंगला होता. तर दुहेरीत शरायू रांजणे व सोयरा शेलार (पुणे) विरुध्द अनुष्का इपटे व प्रकिर्ती शर्मा यांच्यातील सामन्यात तीन सेटमध्ये 25-23, 12-21, 20-22 या अटीतटीच्या सामन्यात रायगडच्या इपटे व शर्माने विजय मिळवला. हा सामना 54 मिनीट रंगला होता. अशा प्रकारे 0-2 ने पुणे संघाला नमवून मुलींच्या रायगड संघाने विजेतेपद संपादन केले.


मुलांच्या संघात ठाणे ने कोल्हापूर, सातारा व मुंबईला पराभूत करुन अंतिम फेरी गाठली. तर पालघर संघाने लातूर, पुणे व नाशिक संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामना ठाणे विरुध्द पालघर यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. यामध्ये सानिध्य एकाडे (ठाणे) विरुध्द देव रुपारेलिया (पालघर) यांच्यातील सामन्यात दोन सेटमध्ये 18-21, 13-21 ने पालघरच्या देव रुपारेलिया विजय संपादन केले. 38 मिनीट हा सामना चालला. दुहेरीत अर्जुन बिराजदार व आर्यन बिराजदार (ठाणे) विरुध्द देव रुपारेलिया व निधीश मोरे (पालघर) यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये 21-17, 25-27, 19-21 ने पालघरचे रुपारेलिया व मोरे यांनी विजय मिळवला. हा चुरशीचा सामना तब्बल 1 तास 12 मिनीट रंगला होता. अशा प्रकारे 0-2 ने ठाणे संघाला पराभूत करुन मुलांच्या पालघर संघाने विजेतेपदावर नाव कोरले. मंगळवारी दिवसभर 15 वर्ष आतील मुले व मुलींची वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेतील सामने सुरु होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *