• Tue. Feb 24th, 2026

नाशिकहून पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत

ByMirror

Jul 10, 2024

मुस्लिम समाजातील उद्योजक मागील बारा वर्षापासून करतात सेवा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने मागील बारा वर्षापासून सायकल वारीचे आयोजन केले जात असून, दरवर्षी करिमशेठ हुंडेकरी या सायकल वारीचे स्वागत करुन हुंडेकरी लॉनमध्ये त्यांच्या जेवणाची, राहण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करत असतात.


मुस्लिम समाजातील हाजी करीमशेठ हुंडेकरी यांनी नाशिकहून पंढरपूरला सायकलवर जाणाऱ्या वारकरींचे मनोभावे स्वागत करुन, दरवर्षी वारकरी माझ्या दारात येतो, मी नशीबवान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने डॉ. मनीषा रौंदळ, माधुरी गडाख, मोहन देसाई, वैशाली शेलार, साधना दुसाणे, मनीषा पवार यांनी हुंडेकरी यांचा सत्कार केला. आमदार संग्राम जगताप यांनी पंढरपूरला सायकलवर निघालेल्या वारीला शुभेच्छा दिल्या. प्रारंभी युगंधर वाद्य पथकाने ढोलचे वादन करुन दिंडीचे स्वागत केले.


75 सायकलपटूंच्या उपस्थितीमध्ये सुरु झालेल्या या दिंडीत तब्बल 500 महिला व पुरुष सायकलपटू दरवर्षी सहभागी होत आहे. पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा जागर करीत निघालेल्या या सायकल दिंडीचा पहिला मुक्काम हुंडेकरी लॉनमध्ये असतो. दरवर्षी हुंडेकरी लॉन त्यांच्या स्वागतासाठी खुले ठेवले जाते. या सोहळ्यासाठी लग्नाची तारीख देखील घेतली जात नाही, तर तो दिवस फक्त या वारकरींसाठी राखीव ठेवला जातो. यामध्ये सर्व सायकलपटू वारकरींच्या राहण्यापासून ते नाष्टा व जेवणाची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *