संत रविदास महाराजांचे समतावादी विचार रुजविण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीचा उपक्रम
शहरात भव्य स्वागताचे नियोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे प्रारंभ रविवारी (दि.7 जानेवारी) श्रीरामपूर येथून होणार असून, त्याच दिवशी ही यात्रा अहमदनगर शहरात येणार आहे. ही यात्रा पुढे कात्रज (जि. पुणे) येथील संत रविदास महाराज तिसरे धाम या ठिकाणी जाणार असल्याची माहिती चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी दिली.

सामाजिक एकात्मता, सलोखा, प्रबोधन, समाजसेवा व समाजोन्नतीच्या दृष्टीकोनाने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून चर्मकार समाज बांधव एकवटणार आहे. शहरात सावेडी, दिल्ली गेट, केडगाव येथून मार्गक्रमण होणार आहे. तर पुढे चास, वाडेगव्हाण, शिरूर, रांजणगाव व भीमा कोरेगाव तसेच पुण्यातील अनेक ठिकाणी या यात्रेचे स्वागत होणार आहे. रविवारी शहरात या यात्रेच्या स्वागतासाठी जंगी नियोजन करण्यात आले आहे.
आज समाजाला संतांच्या विचारांच्या आचरणाची गरज असून, ती जोपासली जावी व संत रविदासांचे मानवतावादी विचार सर्व समाजापुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने ही यात्रा निघत आहे. समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, पिळवणूक करणारे व समाजात जातीय द्वेष पसरविणाऱ्या विरोधात यात्रेच्या माध्यमातून जागृती केली जाणार असल्याचे शिवाजी साळवे यांनी सांगितले आहे.
कात्रज येथील गुरु रविदास यांचे भव्य मंदिर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. मोठ्या संख्येने समाजबांधव यामध्ये सहभागी होणार आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी परिश्रम घेत आहे.