स्वराज परांडे राज्यात 10 वा, ओंकार चेमटे 28 वा आणि अदिराज कोतकर 34 वा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलने यंदाही स्पर्धा परीक्षांमध्ये आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मंथन प्रज्ञाशोध, लक्षवेध प्रज्ञाशोध आणि सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध या विविध राज्यस्तरीय परीक्षांचे नुकतेच निकाल जाहीर झाले असून, या परीक्षेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे.
यामध्ये स्वराज स्वप्नील परांडे या विद्यार्थ्याने तिन्ही परीक्षांमध्ये राज्यात 10 वा क्रमांक मिळवत तालुक्यात प्रथम येण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच ओंकार चेमटे याने राज्यात 28 वा व जिल्ह्यात 21 वा क्रमांक पटकावला. अदिराज धीरज कोतकर याने राज्यात 34 वा क्रमांक मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.
या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशातून ज्ञानसाधना गुरुकुलने गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे आई-वडील, शाळेतील शिक्षक तसेच मार्गदर्शन करणाऱ्या क्लासमधील शबाना शेख, सुवर्णा दाणी, पूर्वा ढोरसकर, नक्षत्रा ढोरसकर तसेच प्रा प्रसाद जमदाडे याचे मोलाचे योगदान लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
