• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

संजयनगरच्या महात्मा फुले वसाहतीमध्ये भुयारी गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ

ByMirror

Jan 14, 2023

उघड्या गटारीमुळे दुर्गंधी, डास व साथीच्या आजारांना बसणार आळा

परिसरातील इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी देखील प्रयत्नशील -अनिल शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील संजयनगर येथे असलेल्या महात्मा फुले वसाहतीमधील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने दलित वस्ती सुधार योजनेतून भुयारी गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.


या परिसरात असलेल्या उघड्या गटारीमुळे दुर्गंधी, डास व साथीच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. नागरिकांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत नगरसेवक शिंदे यांनी पाठपुरावा करुन या परिसरातील भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लावले. या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे, नवेद शेख, किशोर राठोड, सुभाष थोरात, नासिर शेख, आशाबाई साळवे, ओम दळवी, लुकमान शेख, यशवंत साळवे, हमिद शेख, राजू खंडागळे, शहाबुद्दीन शेख, अप्पा नवघिरे, संजीवनी बोरुडे, रंजना दळवी, संगिता उल्हारे, मायाबाई सगळगिळे, कोमल शिंदे, सविता राठोड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉ. अनंत लोखंडे म्हणाले की, झोपडपट्टीवासी व मनपा सफाई कर्मचार्‍यांना शीलाताई शिंदे महापौर असताना अनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने हक्काचा निवारा मिळाला. नगरसेवक शिंदे प्रभागात सातत्याने प्रयत्नशील राहून सर्वसामान्य घटकातील लोकांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तर 2013 साली एकात्मिक गृहनिर्माण योजना हाती घेऊन झोपडपट्टी वासियांना संजयनगर व वारुळाचा मारुती येथे अल्प दरात घरे देण्यात आली. तसेच मनपा सफाई कर्मचार्‍यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून देखील घरे मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले की, महात्मा फुले वसाहतीमध्ये उघड्या गटारीचा व आऊटलेट नसल्याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. तसेच या परिसरातील इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी देखील प्रयत्नशील असून, ते देखील टप्प्याटप्प्याने सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नगरसेवक शिंदे यांनी स्थानिक नागरिक व महिलांची संवाद साधून त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. तर हे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नागरिकांना आश्‍वासन दिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *