• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Dec 25, 2022

सांस्कृतिक कार्यक्रमातून देशातील विविध परंपरेमधील एकात्मतेचे दर्शन

बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुलांमधील कला-गुणांचा विकास आवश्यक -कॉ. प्रा. स्मिता पानसरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- भविष्यात बेरोजगारीचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी मुलांमधील कला-गुणांचा विकास केला पाहिजे. पारंपारिक वाटांबरोबर मुलांच्या उज्वल भविष्यासाठी नवीन वाटा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या क्षमता व कलागुण ओळखून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन द्यावे. पालकांनी चाकोरीबध्द जीवनापलीकडे पहाण्याचे आवाहन कॉ. प्रा. स्मिता पानसरे यांनी केले.


रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनच्या उद्घाटनाप्रसंगी कॉ. पानसरे बोलत होत्या. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते, हाजी शौकत तांबोळी, अंबादास गारुडकर, स्थानिक सल्लागार समिती सदस्य शामराव व्यवहारे, माजी सचिव शिवाजी भोर, विश्‍वासराव काळे, कैलासराव मोहिते, विष्णुपंत म्हस्के, अर्जुनराव पोकळे, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी टी.पी. कन्हेरकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे कॉ. पानसरे म्हणाल्या की, मुलांमध्ये संस्काराची रुजवण कृतीयुक्त कार्यक्रमातून होत असते. चांगले माणूस घडविल्यास सदृढ समाज निर्मिती होईल. समृद्धी महामार्गाने नव्हे, तर मुलांच्या विकासातून समृद्ध समाज निर्माण होणार आहे. कर्मवीर भाऊरावांच्या समतेचा विचार घेऊन बदल घडवावा लागणार आहे. महापुरुषांचे विचार कृतीत उतरवून परिवर्तनवादी पुरोगामी विचारांची कास धरण्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक एस.एल. ठुबे यांनी शाळेत गुणवत्तापूर्ण व अद्यावत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जात आहे. कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य घटकातील मुलांना घडविण्याचे कार्य या शाळेत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


दादाभाऊ कळमकर म्हणाले की, जीवन ही एक स्पर्धा असून, प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरले पाहिजे. स्पर्धा परीक्षांना सामोरे गेल्यास आपल्यातील गुणवत्ता कळणार आहे. सर्व क्षेत्रात मुली आपले कर्तृत्वसिध्द करीत असून, मुला-मुलींना समान संधी देण्याचे त्यांनी सांगितले.


कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्‍या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमातून देशात विविधतेने नटलेल्या परंपरांचे एकात्मतेचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. विविध प्रांतातील संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन, विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कोळी नृत्य, मराठमोळी गाणे, गरबा आदी गीतांनी सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता.गाण्यातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेशही देण्यात आल्या. तर मुलींनी मनोरंजनात्मक उखाणे घेऊन उपस्थितांना हसविले. देशभक्तीवरील गीतांनी कार्यक्रमात स्फुर्ती भरली होती. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप पालवे व स्मिता पिसाळ यांनी केले. आभार महादेव भद्रे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *