• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

मार्कंडेय शाळेने दिव्यांगांसाठी राबविला समता सप्ताह

ByMirror

Dec 8, 2022

विविध उपक्रमातून दिव्यांगाच्या हक्काची जागृती

दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाची वागणूक देणे गरजेचे -बाळकृष्ण सिद्दम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक अपंग दिनाचे औचित्यसाधून समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहतंर्गत विविध उपक्रम राबवून दिव्यांगाच्या हक्काची जागृती करण्यात आली.


समता सप्ताहाचे उद्घाटन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या सचिव रत्नाताई बल्लाळ, विश्‍वस्त राजूशेठ म्याना, भिमराज कोडम, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संदिप छिंदम, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, दिव्यांग बांधव हा समाजातील एक घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. अनेक दिव्यांगांनी जिद्द व कष्टाने शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे. समाजात त्यांना समानतेबरोबर सन्मानाची वागणुक दिली गेल्यास ते आपली प्रगती साधू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मार्कंडेय शाळेत त्यांना सन्मानपूर्क शिक्षण देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दिव्यांग समावेशित शिक्षण उपक्रमातंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसह शहरातील प्रमुख चौकातून समता रॅली काढली. तर वृक्षरोपण अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांसह सर्व शालेय विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

या उपक्रमात इयत्ता 5 वी ते 10 वी च्या शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षिका रंजना गोसके, अनिता भाटीया, अर्चना साळुंके, जयश्री मेहेर, आशा दोमल, प्रमोद चन्ना, नंदकुमार यन्नम, रेणूका खरदास, ग्रंथपाल विष्णू रंगा, सेवक निलेश आनंदास, सुहास बोडखे, अजय न्यालपेल्ली, मथुरा आढाव आदींनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *