• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाकपचे भाजप हटाव… देश बचाव! जनजागरण मोहीमेचे प्रारंभ

ByMirror

Apr 3, 2023

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल बैठकीत निर्धार

पोस्टर व प्रचार पत्रकाचे प्रकाशन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 14 एप्रिल ते 15 मे पर्यंत भाजप हटाव… देश बचाव! ही जनजागरण मोहीम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई येथे आज झालेल्या राज्य कौन्सिल बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी दिली.


मुंबईतील प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पक्षाची राज्य कौन्सिल बैठक राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. बबली रावत व कॉ. ईश्‍वरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशात गेली 9 वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली असून, एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणार्‍या आणि जनविरोधी धोरणे राबविणार्‍या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करत ही जनजागरण मोहीम सुरु करण्यात आली असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


बैठकीत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले, की भाजप सरकारने गेल्या 9 वर्षांच्या काळात संसदीय लोकशाही पद्धतीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध हिंदेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने अधिक उघड झाला आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करणार्‍यांना देशद्रोही लेबल लावून विरोधी स्वर दाबण्याचा प्रकार होत आहे. अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, समाजात दुही निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व राज्यपाल पदाचा दुरुपयोग करून विविध राज्यातील सरकार पाडण्याचे कारस्थान भाजपाकडून सातत्याने केले जात आहे. याशिवाय बेरोजगारीचे प्रश्‍न वाढत असून, कामगार, कर्मचार्‍यांचे प्रश्‍न गंभीर होत असून, या कडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही डॉ. कांगो यांनी सांगितले.


पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी या मोहिमेचा आढावा घेताना देश आणि राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच राज्यात स्थापन झालेले असंविधानिक सरकार आणि त्यासाठी भाजपने केलेले कुटील कारस्थान यावर प्रकाशझोत टाकला. राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून, जनतेला सशक्त डावा पर्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांनी आणि जिल्हा सेक्रेटरींनी महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्याबाबतचा कृतीआराखडा सादर केला. यावेळी मोहिमेच्या पोस्टर व प्रचार पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. राम बाहेती, कॉ. राजू देसले, कॉ. नामदेव चव्हाण, किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. श्याम काळे, कॉ. माधुरी क्षीरसागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रक्षोभक भाषणे करणार्‍यांवर खटले दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्रात सध्या हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून, दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल अशी प्रक्षोभक भाषणे या निमित्ताने केली जात आहेत. अशा प्रक्षोभक भाषणे करणार्‍यांवर पोलिसांनी खटले दाखल करावेत, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल बैठकीत एकमताने करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *