• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

पत्रकारितेचे व्रत घेऊन महाराष्ट्रातील पत्रकार काम करतात

ByMirror

Jun 24, 2023

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मराठी पत्रकार परिषदेचा गौरव

उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा पुरस्कार देउन सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकारिता हे एक वृत्त आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहेत. पण आज पत्रकारांना सत्य लिहिण्याची किंमत मोजावी लागते. कारण सत्य हे अनेकांना प्रिय नसते. मात्र त्यानंतरही महाराष्ट्रात पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत, याचा खूप आनंद होतो. पत्रकारांतीचे एक गुणात्मक परिवर्तन आजही महाराष्ट्रात पाहण्यास मिळते. महाराष्ट्रातील पत्रकार ज्या पद्धतीने काम करतात, ते इतरत्र पाहण्यास मिळत नाही, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त करतानाच मराठी पत्रकार परिषदेच्या कामाचे कौतुक केले.


85 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. 2022 च्या पुरस्कारांचे वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.


मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषेदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख हे होते. तर, याप्रसंगी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर , सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिझिटल शाखेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, सह राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे, कार्याध्यक्ष संजय मिस्किन, उपाध्यक्ष विनायक सानप, सरचिटणीस दीपक पवार, कोषाध्यक्ष पांडुरंग म्हस्के, सहसचिव विशाल परदेशी यांच्यासह आदी पदाधिकारी, राज्यभरातून आलेले पत्रकार उपस्थित होते.


आपला देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे, असे सांगतानाच गडकरी पुढे म्हणाले, लोकशाहीचा मीडिया हा एक स्तंभ आहे. लोकशाहीचे ज्ञान सामान्य माणसापर्यंत नेण्याचे काम हे पत्रकार करीत असतात. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारांनी करावे. समाजासाठी चांगले काम करणार्‍या व्यक्तींचे जीवन चरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी काम करण्याची गरज आहे. कारण भविष्यकाळ हा ज्ञानाशी संबंधित असतो, व कोणतेही ज्ञान हे संवादाशी संबंधित असते. एखाद्या व्यक्तीचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार जेव्हा करतात, तेव्हा ते हजार लोकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम करत असतात. एखाद्या व्यक्तीचे यश हे हजार लोकांपर्यंत नेण्याचं काम पत्रकार करू शकतात, हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. त्यामुळेच पत्रकारितेचे व्रत स्वीकारून एक व्रतस्थ पत्रकार म्हणून प्रत्येक पत्रकारांनी काम करावे, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याचे कौतुक केले.


याप्रसंगी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, एखाद्याला पुरस्कार मिळणे फार कठीण गोष्ट असते. त्यासाठी खूप चांगलं काम करावे लागते. संघटनेसाठी वाहून घेतलेली एस. एम. देशमुख यांच्यासारखी माणसेच संघटना उभी करू शकता. हे आज या संघटनेच्या ताकतीवरून दिसून येत आहे. माझे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांची खूप मोठी भूमिका आहे. सत्तेचे बाजू मांडायचे काम पत्रकार नेहमीच करत असतात, असेही ते म्हणाले.


परिषेदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांबाबत भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रमध्ये पेन्शन योजना पत्रकारांसाठी सुरू झाली, पण गेल्या सहा वर्षात फक्त 130 लोकांना पेन्शन मिळाली. या पेन्शन योजनेतील जाचक अटी दूर करून जास्तीत जास्त पत्रकारांना पेन्शन द्यावी, यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही सरकारने प्रयत्न करावेत. पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा महाराष्ट्रात असला तरी त्याची चांगली अंमलबजावणी व्हावी, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अशा विविध मागण्या देशमुख यांनी गडकरी यांच्याकडे करतानाच मराठी पत्रकार परिषदेच्या कामाची माहिती दिली.


यावेळी गडकरी यांच्या हस्ते पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त पत्रकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी भावना व्यक्त करुन पुरस्कारच्या रूपामध्ये मिळालेला 25 हजाराचा धनादेश संघटनेला मदत म्हणून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले. स्वागत मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी पाटील यांनी केले, व आभार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनी मांडले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *