मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते झाला गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या महामारीत अविरत रुग्णसेवा करुन अनेकांचे जीव वाचविणारे डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सावेडी येथील माऊली सभागृहात झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी डॉ. सुधा कांकरिया, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नागेबाबा उद्योग समूहाचे कडूभाऊ काळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील, आमदार निलेश लंके, डॉ. हर्षा पियुष पाटील, डॉ. मयुरी पाटील, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आरोग्य व प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून रविवारी (दि.4 डिसेंबर) शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. फ.मु. शिंदे यांनी यांनी आईचे श्रेष्ठत्व सांगणार्या कवितेने संपूर्ण सभागृह भारावला. दुर्गाताई तांबे यांनी सामाजिक कार्य करणार्यांना पुरस्काररुपाने कामाची प्रेरणा मिळत असते. तर त्यांचे कार्य समाजापुढे येऊन इतरांसाठी ते कार्य दिशादर्शक ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. पियुष पाटील सावेडी येथील प्राईम केअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करीत आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन देण्याचे काम केले. या रुग्णसेवेची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
