आरपीआयच्या संवाद बैठकीत गवई यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद
कार्यकर्त्यांचा रिपाईमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जातीयवादी प्रवृत्ती थोपविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून व्यापक चळवळीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केले. शहरासह जिल्ह्यात समाजात अशांतता पसरविण्यासाठी सुरू असलेल्या जातीयवादी प्रवृत्तीचा त्यांनी निषेध नोंदविला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद बैठक रविवारी (दि. 30 ऑगस्ट) शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत राजेंद्र गवई बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, विजय शिरसाठ, नईम शेख, अजीम खान, सचिन शिंदे, स्वप्नील साठे, शुभम ठोंबे, नजीर देशमुख, लकी वाघमारे, राहुल ठोकळ, प्रकाश थोरात, जमीर सय्यद, जावेद सय्यद, योहान चाबुकस्वार, अजीज शेख, अरबाज शेख, हुसेन चौधरी, सुशील म्हस्के, चिकू गायकवाड, महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, संपदा म्हस्के, ताई पगारे, मनीषा गायकवाड, कमल वाघमारे, पूजा साठे, वाश्रांति पठारे, रेश्मा जाधव, शितल नाटिकर, रिना पाटोळे, सारिका साळवे, सोनाली बनसोडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेंद्र गवई म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पक्षाचे काम सुरू आहे. संविधानविरोधी जातीयवादी पक्षांबरोबर न जाता पक्षाच्या विचारधारेने कार्य सुरू आहे. सत्तेची हवा पाहून त्याबरोबर वाहिलो नाही. विचारांवर ठाम राहिल्याने सत्तेबरोबर गेले नाही. आंबेडकरी चळवळीचा विचार पुढे घेऊन काम सुरू आहे.
महाराष्ट्रात मागासवर्गीय जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शविताना राज्य सरकारने अटी व शर्तींचा भंग केल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही अभ्यास न करता अजेंडा राबविला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राला वर्गीकरणाची गरज नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरासह जिल्ह्यात समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तींचा निषेध करून या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गवई यांनी सांगितले.
प्रास्ताविकात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष कधीही जातीयवादी विचारधारेबरोबर जाणार नाही. जातीयवादी सरकार प्रत्येक जाती-धर्मात भांडण लावून सत्ता राबवित आहे. तसेच ईव्हीएम घोटाळा असल्याने त्यांना कोणत्याही समाजाशी देणेघेणे नाही, असे त्यांनी सांगितले. ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन उभारण्यासाठी जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. जात-धर्म न पाहता अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचे गवई यांच्या हस्ते सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. दानिश शेख यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. संवाद बैठकीत विविध पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये ताई पगारे यांची कोपरगाव तालुका अध्यक्षपदी, महेश भिंगारदिवे यांची नगर तालुका अध्यक्ष (मेहकरी) म्हणून, शारोन क्षेत्रे यांची पाथर्डी उपतालुका अध्यक्षपदी, राजू आरु यांची टाकळी येथील पदावर, आकाश भिंगारदिवे यांची नगर तालुका सचिव (निंबोडी) म्हणून, तर फयाज शेख यांची अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष (आलमगीर) म्हणून निवड करण्यात आली. पक्षाच्या विचारधारेनुसार संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संवाद बैठकीला आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नूतन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

