• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

राहुरीतील सुरक्षा रक्षक श्रीकांत दोंदे हत्याप्रकरणी विद्यापीठ प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

ByMirror

Jun 14, 2026
उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, कुटुंबाला नुकसानभरपाई व नोकरीची मागणी;

उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, कुटुंबाला नुकसानभरपाई व नोकरीची मागणी;


आठ दिवसांत निर्णय न झाल्यास नगर-मनमाड महामार्ग रोकोचा इशारा; श्रीकांत दोंदे हत्येच्या निषेधार्थ शिवसेना सामाजिक न्याय विभाग आक्रमक


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मागासवर्गीय दलित कुटुंबातील श्रीकांत पोपट दोंदे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई व पुनर्वसन देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.


जिल्हाध्यक्ष विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा सचिव विजय लोंढे, महिला जिल्हाप्रमुख कावेरी भिंगारदिवे यांच्यासह पँथरचे चंद्रकांत जगधणे, राजेंद्र पाटोळे, पोपट दोंदे, दिलीप निकाळे, कृष्णा कांबळे, प्रियंका कदम, अशोक दोंदे, विक्रम दोंदे, भाऊसाहेब पंडित आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


श्रीकांत दोंदे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. 2 जून 2026 रोजी कर्तव्य बजावत असताना त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, या हत्येमागील सर्व पैलूंचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सध्या सुरू असलेला तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करून स्वतंत्र आणि निष्पक्ष यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.


यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षाविषयक व्यवस्थेवरही गंभीर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. श्रीकांत दोंदे ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, अपुरी प्रकाशयोजना, सुरक्षारक्षकांना आवश्‍यक सुरक्षा साहित्य न देणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी न होणे यासारख्या गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला. या निष्काळजीपणामुळेच दोंदे यांना जीव गमवावा लागल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.


त्यामुळे सुरक्षा अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. श्रीकांत दोंदे हे आपल्या कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासन आणि विद्यापीठ प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला विद्यापीठ किंवा सरकारी सेवेत नोकरी देऊन पुनर्वसन करावे, अशीही मागणी करण्यात आली.


या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आरोपींवर यापूर्वी चोरी, खून यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे नमूद करत त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठात रोजनदारीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची मागणीदेखील आंदोलनातून करण्यात आली.


दरम्यान, आंदोलनाची दखल घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा कार्यालयाने लेखी आश्‍वासन दिले. कै. श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या विमा रकमेबाबत आवश्‍यक कागदपत्रे, म्हणजे मृत्यूचा दाखला, शवविच्छेदन अहवाल आणि वारस दाखला प्राप्त होताच मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारामार्फत पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, येत्या आठ दिवसांत मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास 23 जून रोजी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विनोद साळवे यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *