• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अखेर बनावट वाराई पुस्तक छपाई प्रकरणी गुन्हे दाखल

ByMirror

Dec 20, 2022

सह्याद्री छावा सामाजिक संघटनेच्या उपोषणाला यश

बनावट वाराई पुस्तकाद्वारे 53 हजारपेक्षा जास्त रकमेचा अपहार

अहमदनगर (प्रतिनिधी)- माथाडी कामगार मंडळाच्या बनावट वाराई पुस्तक छपाई करुन पैश्याचा अपहार केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री छावा सामाजिक संघटनेच्या वतीने वेळोवेळी केलेला पाठपुरावा व उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने शेवटी त्या टोळी प्रमुखावर गुन्हा नोंदवला.


माथाडी कामगार मंडळाच्या बनावट वाराई पुस्तक छपाई करुन पैश्याचा अपहार करणार्‍यावर कायदेशीर कारवाई होत नसल्याने संघटनेच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात आले होते. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात किरण शिंदे, विलास कुर्‍हाडे, विजय वहाडणे, महेश गूंजकर, राम कराळे, दत्तात्रय वामन, दीपक साळवे, शाहीर कान्हू सुंबे, दिपक वर्मा आदी सहभागी झाले होते.


सहायक कामगार आयुक्त नितिन कवले व माथाडी मंडळाचे जगधने यांनी भेट देऊन उपोषण कर्त्यांशी चर्चा केली. मात्र अपहार प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल होत नाही, तो पर्यंत उपोषण मागे न घेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. शेवटी सोमवारी (दि.19 डिसेंबर) रात्री उशीरा माथाडी मंडळाचे कर्मचारी प्रदीप भाऊसाहेब जगधने यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाणे येथे माथाडी कामगार मंडळाच्या बनावट वाराई पुस्तक छपाई करुन पैश्याचा अपहार केल्याप्रकरणी टोळीचा प्रमुख कुमार मच्छिंद्र क्षित्रे यांच्यावर फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


2015 ते 2018 दरम्यान एमआयडीसी येथील एक्साईड इंडस्ट्रीज कंपनीतील टोळीप्रमुख कुमार मच्छिंद्र क्षित्रे यांना माथाडी मंडळाची वाराई पावती पुस्तके देऊन नियमानुसार वाराई वसुल करुन ती रक्कम महामंडळात जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी मंडळाची फसवणुक करुन बनावट वाराई पुस्तके तयार करुन माथाडी मंडळाचे 53 हजार 881 रुपये व त्यापेक्षा अधिक शासनाच्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत जगधने यांनी म्हंटले आहे. या फिर्यादीवरुन टोळीचा प्रमुख कुमार मच्छिंद्र क्षित्रे याच्यावर भा.द.वि. कलम 420, 408, 403, 464, 465, 467, 468, 471 व 474 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशीरा उपोषण मागे घेण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *