राज्यकर्ते मतदारांना मेंढरं करून सत्ता भोगत आहे -अॅड. कारभारी गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक शासन प्रणाली मध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय संसदेने जारी केला आहे. भारतीय लोकशाहीमध्ये मतदारांना जात आणि धर्माच्या नावावर फसवून किंवा कोंबडी, दारु, पैश्याची लालूच दाखवून मागच्या दाराने सत्ता मिळवणार्या सत्तापेढार्यांना घरचा रस्ता दाखाविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
हसरा मतदार, हसरी लोकशाही आणण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र फारच उपयुक्त ठरणार आहे. अनेक विचारवंतांनी त्याला पाठिंबा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा उत्कृष्ट शासन-प्रशासन राबविणारा उमेदवार पुढे आणून ऑपरेशन पर्याय निर्माण करण्याची गरज आहे. याचबरोबर मतदाराला विकत घेणार्याला डिच्चू कावा देऊन सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी राजकारणात येणार्यांना डब्यात टाकता येणार आहे. जे उमेदवार मतदारांना विकत घेतात, ते देश विकल्याशिवाय राहणार नाही. ही बाब प्रत्येक मतदाराच्या मनावर बिंबवण्यासाठी हे अभियान कार्य करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मतं खरेदी करणार्या विरोधात डिच्चू कावा तंत्राचा वापर करणे, म्हणजे प्रजासत्ताक राजधर्म पाळण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने यापुढे जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर केला पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षे भोंगा, हनुमान चालीसा, शेंडी शेंदूर, मंदिर, मस्जिदला प्राधान्य दिले जात आहे. महागाई, बेकारी, झोपडपट्टी निर्मूलन, गरिबी हटवा या सगळ्या योजना दिल्लीपासून गल्लीपर्यंत डब्यात गेल्या आहेत. राज्यकर्ते फक्त मतदारांना मेंढरं करून सत्ता भोगत आहे. परंतु यापुढे हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियानाद्वारे घराघरात, देशभरात जय शिवाजी जय डिच्चू कावा तंत्र गेल्याशिवाय राहणार नसल्याचे अॅड. गवळी यांनी सांगितले. या अभियानासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.