कुठे सत्तापरिवर्तन तर कुठे योग्य बाजूने कौल देऊन जनतंत्राचा विजय झाल्याचा
अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, गोवा व पंजाब मध्ये सर्वसामान्य मतदारांनी कुठे सत्तापरिवर्तन तर कुठे योग्य बाजूने कौल देऊन जनतंत्राचा विजय घडविल्याचा शहरात सैनिक समाज पार्टीच्या वतीने मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करण्यात आला.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उपस्थितांनी मतदारांच्या विजयच्या घोषणा दिल्या. यावेळी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे, जनरल सेक्रेटरी अरुण खीची, अॅड. संदीप भगवानराव डमाळे, दत्तात्रय कोतकर, माजी सैनिक रवींद्र आचारी, दीपक वर्मा आदी उपस्थित होते.
सैनिक समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, विविध राज्यातील निवडणुकीमध्ये सामान्य समाजातील सर्वसामान्य मतदारांनी परिवर्तनचा झेंडा फडकावून घराणेशाही संपविण्याचा सूचक इशारा दिला आहे. या निवडणुकीत भारतीय राज्य व्यवस्थेचे परिवर्तन घडविण्यात आले आहे. सैनिक समाज पार्टी देशातील वंशवाद, प्रस्थापित घराणेशाही, पक्षातील गुंड, भ्रष्टाचार विरोधात लढा देत आहे. अशा प्रवृत्तीचे राजकारण्यांना हद्दपार करण्यासाठी बौद्धिक आंदोलन सुरु आहे. हे विचार घेऊन सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तर वर्षांपासून या देशात समाजातील देशभक्त, देशप्रेमी नागरिकांचे सरकार आलेच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना खरे स्वातंत्र्य मिळाले नाही. खरी लोकशाही व लोकतंत्र अस्तित्वात आनण्यासाठी सैनिक समाज पार्टीचा लढा सुरु असल्याचेही अॅड. डमाळे यांनी सांगितले.