• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

सापशिडीच्या खेळातून युवक-युवतींमध्ये वाहतुकीच्या नियमांची जागृती

ByMirror

Jan 18, 2023

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सांदिपनी अकॅडमीत रंगला कार्यक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सापशिडीच्या खेळातून युवक-युवतींमध्ये वाहतुकीच्या नियमांची जागृती करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानातंर्गत सावेडी येथील सांदिपनी अकॅडमीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


या खेळात युवकांनी सहभाग नोंदवून वाहतुकीचे नियम जाणून घेतले. पदचारी, वाहनधारक यांच्या सुरक्षिततेचे व वाहन चालविताना नियमांच्या काळजीबद्दल प्रश्‍नोत्तरी खेळ सापशिडीवर रंगला होता. वाहतुकीचे नियमांचे बरोबर उत्तर देऊन पुढे जाणारे व चुकीच्या उत्तराने सापाच्या तोंडात जाऊन अपघाताला कारणीभूत ठरणारा हा मनोरंजनात्मक खेळ रंगला होता. यामध्ये विजेत्या झालेल्यांना बक्षिस देण्यात आली.


मोटर वाहन निरीक्षक सुकन्या क्षेत्रे म्हणाल्या की, स्वत:च्या सुरक्षिततेसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. अपघातात एखादा कर्ता पुरुष दगावल्यास तो संसार उघड्यावर येतो. कुटुंबीयांच्या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करुन, वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली.


अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. अकॅडमीचे संचालक अमित पुरोहित म्हणाले की, युवकांमध्ये जागृती झाल्यास मोठा बदल घडणार आहे. सुशिक्षित युवकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन आपल्यासह इतरांचे जीव देखील सुरक्षित ठेवण्यास योगदान देण्याचे सांगितले.

यावेळी अकॅडमीचे संचालक नानासाहेब बारहाते, अमित पुरोहित, मनिष कुमार, राहुल गुजराल आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *