विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रोफेसर चौक रोड येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर शिवाजी महाराजांना अभिवादन करुन कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे युवकांना वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश सोनवणे, भाऊसाहेब आव्हाड, सय्यद साबीर अली, शिवाजी साबळे, श्रीराम येंडे, सचिन तनपुरे, ऋषिकेश कानडे, दिलीप (अण्णा) शेळके आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब आव्हाड म्हणाले की, महापुरुषांची जयंती फक्त घोषणा देवून वाद्यांवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार आत्मसात करुन प्रेरणा घेण्यासाठी आहे. शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील महापुरुष देखील सध्या जाती धर्मात वाटले जात असून, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक व धार्मिक ऐक्य प्रस्थापित होण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सर्वांसमोर जाण्यासाठी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.