• Mon. Jan 13th, 2025

शहरात मागासवर्गीय युवक व महिलांसाठी निशुल्क लेदर प्रोडक्ट प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

ByMirror

Aug 13, 2022

महिनाभर केले जाणार उद्योग-व्यवसाय प्रशिक्षणासह ब्रँडिंग ते विक्रीचे मार्गदर्शन

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पारंपारिक व्यवसायाला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी -संजय खामकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) अहमदनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) तसेच रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांच्या पुढाकाराने विशेष घटक योजनेतंर्गत आयोजित करण्यात आलेल्या निशुल्क लेदर प्रोडक्ट प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे संचालक संजय खामकर यांच्या हस्ते झाला. या महिनाभराच्या प्रशिक्षण कार्यशाळेत युवकांना उद्योग-व्यवसाय प्रशिक्षणासह ब्रँडिंग ते विक्रीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांसह महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.


महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे यांनी जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व शासनाचे उदयोग-व्यवसाया संबंधित विविध विभाग आणि प्रकल्पांच्या माध्यमातून शासनाद्वारे होणार्‍या वित्तीय पुरवठ्याची माहिती दिली. बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी अनुसूचित जाती, मागासवर्गीय युवकांना उद्योग-व्यवसायाकडे आकर्षित करून त्यांना विविध उद्योग-व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम देण्याचे व त्यांना पायावर उभे करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. राष्ट्र उभारणीसाठी युवकांना व्यवसाभिमुख प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेदर प्रोडक्ट संदर्भात कार्यशाळा घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. करियर मार्गदर्शक दिनेश देवरे यांनी नोकरी मागे न धावता युवकांनी उद्योग-व्यवसायाशी संबंधित कौशल्य अंगीकारुन जीवनात उभे राहण्याचे सांगितले.


संजय खामकर म्हणाले की, उद्योग, व्यवसायात अनुसुचित जाती व मागासवर्गीय समाजातील युवक मागे राहिला आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पारंपारिक व्यवसायाला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे. लघु व मध्यम उदयोग-व्यवसायांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध सबसिडी उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन आपला ब्रॅण्ड बनविण्याच्या भावनेने युवकांनी उद्योग व्यवसायात उतरण्याचे त्यांनी सांगितले.


महिनाभराच्या लेदर प्रॉडक्ट प्रशिक्षणात राज्यातील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सोनवणे यांनी केले. याप्रसंगी कोपरगाव येथील लेदर प्रॉडक्ट उद्योजक व प्रशिक्षक विशाल पोटे, वधुवर समितीचे कोषाध्यक्ष अरुण गाडेकर उपस्थित होते. बार्टीच्या नगर तालुका समतादूत प्रेरणा विधाते यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *