गुरुवारी शहरातून निघणार शोभायात्रा
दोन दिवस धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाविकांना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष कृष्ण जन्माष्टमीचे कार्यक्रम झाले नसल्याने यावर्षी मिरवणुकसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी दिली.
गुरुवारी (दि.18 ऑगस्ट) दुपारी 3 वाजता सर्जेपुरा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भजन संध्येनंतर रात्री किर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून, वैष्णवाचार्य श्री युगल शरणजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून किर्तन होणार आहे. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. शुक्रवारी (दि.19 ऑगस्ट) सकाळी मंदिरात कालाष्टमी भजन व किर्तनाच्या कार्यक्रमानंतर बालगोलांच्या दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध धार्मिक कार्यक्रमात समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.