विद्यार्थ्यांनी केले गुरुपूजन
एकवीसाव्या शतकातही सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी गुरुंची भूमिका महत्त्वाची -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकांचे पूजन करुन गुरुंची महती आपल्या भाषणात सांगितली.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगिता वाघमारे, अहिल्या सांगळे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
अनिता काळे म्हणाल्या की, एकवीसाव्या शतकातही सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी गुरुंची भूमिका महत्त्वाची आहे. फक्त उच्च शिक्षण देऊन विद्यार्थी घडणार नसून, त्याला संस्काराची जोड द्यावी लागणार आहे. यासाठी शिक्षक गुरुंच्या भूमिकेत आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. राजमाता जिजाऊ सारखे गुरु लाभल्याने शिवाजी महाराजांनी खर्या अर्थाने स्वत:चे राज्य निर्माण केले. गुरु हे शिष्याला दिशा देत असतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंच्या आज्ञेचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेखा वाघ यांनी गुरु विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन एकलव्याचा आदर्श घेणे काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेले भेटकार्ड व भेटवस्तू शिक्षकांना दिल्या.