• Thu. Jan 16th, 2025

बाबुर्डी घुमट येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन

ByMirror

Sep 6, 2022

तरुणांना देशाप्रती व आई-वडिलांप्रती श्रद्धा असणारे संस्कारमय शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी)- जे नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले, त्याच्या अंमलबजावणीनंतर यासाठी कमी वर्ष लागावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती स्वत:च्या स्वार्थासाठी भारतीयांवर लादली, त्या जोखडातून आपण बाहेर पडत आहोत. प्रामुख्याने खर्‍या अर्थाने देशातील तरुण-तरुणींना भारतीय शिक्षण मिळणे व त्यांच्या हाताला काम मिळावे. सर्वात महत्त्वाचे देशाप्रती व आई-वडिलांप्रती श्रद्धा असणारे संस्कारमय शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.


नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. प्रारंभी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन कामाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी पुणे विद्यापिठाचे कुलगुरु प्रा.डॉ. कारभारी काळे, प्र. कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, सुजीत झावरे, अधिसभा सदस्य राजेंद्र विखे पाटील, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राजेश पांडे, उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी, बाबुर्डीच्या सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तानाजी परभणे, प्रा. डॉ. सुधाकर जाधव, प्रा.डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, शिवाजी साबळे आदींसह उपकेंद्र समन्वय समिती सदस्य व बाबुर्डी घुमटचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले की, पुणे विद्यापीठ विस्तारलेले असून, यामध्ये नऊशे महाविद्यालयांचा समावेश आहे. युनिट लहान करण्यासाठी नाशिक प्रमाणे नगरला देखील उपकेंद्र व्हावे या उद्देशाने या उपकेंद्राची पायाभरणी केली जात आहे. दोन वर्षात ही इमारत पूर्ण होणार आहे. विद्यापिठाचे उपकेंद्र बाबुर्डी घुमट गावाची शान होणार आहे. रोजगार निर्मिती होऊन नवीन कोर्सेसचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. गावाची ओळख बदलणार असून, उपकेंद्र असलेले गाव म्हणून लोकांपुढे येणार आहे.

स्थानिकांना नोकर्‍या देताना कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न केले जाणार आहे. तसेच ग्रामस्थांचा गायरान जमिनीचा प्रश्‍न देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी बोलून सोडविला जाणार असून, शाळांच्या वर्ग वाढीसाठी व ग्रामपंचायतीच्या जागेचा प्रश्‍न देखील सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तर गावाचे नुकसान होणार नसल्याचे ठाम मत व्यक्त केले.


बाबुर्डी घुमट ग्रामस्थांच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तानाजी परभणे यांनी सत्कार केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *