• Fri. Mar 21st, 2025

बाबुर्डी घुमटला राज्यपालांच्या हस्ते होणार पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन

ByMirror

Aug 29, 2022

उपकुलगुरुंकडून जागेची पहाणी

शैक्षणिक हब म्हणून बाबुर्डी घुमट पुढे येणार -उपकुलगुरु संजय सोनवणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे साकारत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी उपकुलगुरु संजय सोनवणे यांनी नुकतीच केली.


6 सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सोनवणे यांनी बाबुर्डी घुमटला भेट देऊन नियोजित उपकेंद्राच्या जागेची पहाणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नमिता पंचमुख व उपसरपंच मेजर तानाजी परभणे यांनी सोनवणे यांचा सत्कार केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब चव्हाण, बाबासाहेब परभणे, सोनू मुंजाळ, पवन लांडगे, भाऊसाहेब लांडगे, रामलाल मोरे, महादेव गवळी, राहुल पंचमुख, संतोष चव्हाण, पोपट चव्हाण, शरद भगत, अंकुश परभणे, सुभाष परभणे, बन्सी परभणे, संजू गुंड, संदिप परभणे, बाळासाहेब परभणे, गंगाधर कोतकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


उपसरपंच मेजर परभणे यांनी पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण सहकार्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. उपकुलगुरु संजय सोनवणे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकर सुरू होणार आहे. यासाठी तीन कोटींचा निधी आला आहे. दोन ते तीन वर्षात शंभर ते दोनशे कोटीचा निधी येणार असून, बाबुर्डीचे पूर्ण स्वरूप बदलणार आहे. शैक्षणिक हब म्हणून बाबुर्डी घुमट पुढे येणार असून, गावाच्या योगदानात देखील सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुळाडॅमचे पाणी गावाला मिळण्यासाठी नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *